हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव व औंढा नागनाथ (Aundha Nagnath) या दोन नगरपंचायत नगराध्यक्ष पदाची निवडणूक आज मोठ्या गाजावाजात पार पडली. सेनगाव येथे शिवसेनेच्या ज्योती देशमुख (Jyoti Deshmukh) यांची बहुमताने निवड झाली. या ठिकाणी महाविकास आघाडीची सत्ता आली होती. तर औंढा नागनाथ नगर पंचायतीत शिवसेनेची एक हाती सत्ता आल्याने येथेही शिवसेनेच्या राजू उर्फ कपिल खंदारे (Kapil Khandare) यांची नगराध्यक्षपदी वर्णी लागली आहे. दोन्ही नगराध्यक्षपदांची निवड झाल्यानंतर शिवसेनेच्या वतीने विजयी मिरवणूक काढण्यात आली. कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण आणि जोरदार घोषणाबाजी करत हा विजय साजरा केला.
सेनगाव नगराअध्यक्ष पद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाले आहे. येथे आज नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक पार पडली. आज झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडीत नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या वतीने एक तर भाजपाच्या वतीने एक नाम निर्देशन पत्र दाखल करण्यात आले आहे. नगरपंचायतच्या 17 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल हाती आल्यानंतर नगराध्यक्ष पद कुणाकडे जाते याची उत्सुकता सगळ्यांना लागली होती. या निवडणुकीत सर्वच पक्ष एकमेकांच्या विरोधात लढले असले तरी सध्या सेनगाव नगरपंचायतीवर महाविकास आघाडीची सत्ता आली. या निवडणुकीत काही धक्कादायक निकालही लागले होते त्यात शिवसेनेचे 05, राष्ट्रवादी 05,भाजप 05,कॉग्रेस 02 असा त्रिशंकू निकाल मतदारांनी दिला होता. मात्र भाजपा चमत्कार करील अस बोलले जात होते. मात्र चमत्कार होईल हा भाजपचा दावा फोल ठरवत सेनगाव मध्ये महाविकास आघाडीने झेंडा रोवला आहे…सेनगाव येथे शिवसेनेच्या ज्योती देशमुख यांची बहुमताने अध्यक्षपदासाठी निवड झाली.
इकडे औंढा नागनाथ नगराअध्यक्ष पद अनुसूचित सर्वसाधारणसाठी आरक्षित झाले आहे. या ठिकाणी शिवसेनेतर्फे एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले होते. औंढा नागनाथ नगरपंचायतीत शिवसेनेची एक हाती सत्ता आली आहे. येथे राजू उर्फ कपिल खंदारे यांची नगराध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाली. औंढा नगरपंचायतीमध्ये शिवसेनेचे नऊ नगरसेवक निवडून आल्याने शिवसेनेची एक हाती सत्ता आली. तर काँग्रेसचे 04 भाजपाचे 02 वंचित आघाडीचे 02 असे पक्षीय बलाबल इथे दिसून आले.
इतर बातम्या-