हिंगोली | 26 नोव्हेंबर 2023 : तारीख होती 17 नोव्हेंबर… या दिवशी राज्यातील सर्व ओबीसी नेते एकाच मंचावर पाहायला मिळाले. शिंदे सरकारमधील मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात जालन्यातील अंबडमध्ये ओबीसी आरक्षण बचाव एल्गार महासभा पार पडली. या सभेत छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर एकामागोमाग एक टीकेचे बाण सोडले. भुजबळांच्या या भाषणाची राज्यभर चर्चा झाली. सगळ्या पार्श्वभूमीवर आज हिंगोलीत ओबीसी महासभा होत आहे. हिंगोलीतील रामलिला मैदानावर ओबीसी महासभा होत आहे. सकाळी 11 वाजता ओबीसी एल्गार महामेळाव्याला सुरुवात होणार आहे. आजच्या भाषणात छगन भुजबळ काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष आहे.
ओबीसी भटके विमुक्त एल्गार महासभा हिंगोलीत होत आहे. या सभेसाठी छगन भुजबळ नांदेड विमानतळावर दाखल झाले आहेत. भुजबळ यांच्या स्वागतासाठी नांदेड विमानतळावर सकल ओबीसी समाजाचे कार्यकर्ते हजर आहेत. छगन भुजबळ, पंकजा मुंडे, प्रकाश शेंडगे, संजय राठोड, गोपीचंद पडळकर, महादेव जानकर यांचे फोटो असलेले बॅनर घेऊन कार्यकर्ते दाखल विमानतळावर दाखल झालेत. देश का नेता कैसा हो छगन भुजबळ जैसा हो!, अशा घोषणाबाजी इथे करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर चोख पोलीस बंदोबस्त पाहायला मिळतोय. स्वराज्य संघटनेने सभा उधळून लावण्याच्या इशारा दिल्यानंतर पोलीस अलर्ट मोडमध्ये आहेत.
छगन भुजबळ आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार पुन्हा एका मंचावर येणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विजय वडेट्टीवार आज हिंगोलीच्या ओबीसी मेळाव्याला जाणार होते. मात्र अचानक ते हैद्राबादकडे रवाना झाल्याची माहिती आहे. हैद्राबादवरून हिंगोलीच्या ओबीसी मेळाव्याला वडेट्टीवार पोहचणार का? या बद्दल प्रश्नचिन्ह आहे. नागपूर विमानतळावरून ते हैद्राबादला रवाना झालेत. तेलंगणामध्ये काँग्रेसचे काही कार्यक्रम असल्याने वडेट्टीवार हैद्राबादला गेल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे हे दोन नेते पुन्हा एका मंचावर पाहायला मिळणार का?, असा सवाल विचारला जातोय. त्यामुळे दोन्ही नेत्यांच्या भाषणाकडे राज्याचं लक्ष आहे.
थोड्याच वेळात ओबीसी एल्गार महामेळाव्याला सुरुवात होणार आहे. सकाळपासूनच ओबीसी बांधव मेळाव्याला यायला सुरुवात झाली आहे. सभास्थळी गर्दी होऊ लागली आहे. हिंगोली शहरात सर्वत्र ओबीसींचा एल्गार महामेळाव्याचे होर्डिंग्ज पाहयला मिळत आहेत. ओबीसींच्या या एल्गार महामेळाव्यावर पावसाचं सावट पाहायला मिळतंय. हिंगोलीत सध्या ढगाळ हवामान पाहायला मिळतंय.
ओबीसी मेळाव्यात हलगी नृत्य सुरू आहे. भटक्या समाजातील लोकं आपल्या पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले आहेत. त्यांनी पारंपरिक हलगी नृत्य करायला सुरूवात केली आहे.