हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात आता पावसाचा जोर काहीसा कमी झालाय. जिल्ह्यातील 12 मंडळात बुधवारी अतिवृष्टी (Heavy Rain) झाली. त्यामुळे नुकतंच उगवून आलेल्या पिकांचं मोठं नुकसान (Crop Loss) झालंय. जिल्ह्यात माळहिवरा मंडळात सर्वाधिक 84 मिलिमीटर तर हिंगोली मंडळात 80 मिलिमीटर पावसाची नोंद झालीय. हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदा गावात अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी (Rain Water) शिरलं. गावातील एसबीआय बँक, जगद्गुरू पतसंस्था आणि शिवेश्वर सहकारी बँकेच्या तिजोरीतही पावसाचं पाणी शिरलं. त्यामुळे तिनही बँकांची मिळून तब्बल 12 लाख 22 हजार रुपयांची रोडक भिजली आहे. तशी माहिती बँकेच्या शाखाधिकाऱ्यांनी दिलीय.
पावसाचं पाणी बँकेत शिरलं. हे पाणि तिजोरीतही गेल्यानं जगद्गुरु पतसंस्थेचे 12 लाख रुपये तर शिवेश्वर बँकेचे 22 हजार रुपये भिजले आहेत. तशी माहिती बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिलीय. आसना नदीला आलेल्या पुरामुळे कुरुंदा गावात जवळपास 4 फुटापर्यंत पाणी शिरलं होतं. नदीकाठी असलेली काही घरं पाण्याखाली गेली होती. त्यामुळे अनेक घरातील साहित्य आणि धान्याची नासाडी झाली. तसंच काही घरांची मोठी पडझडही झाली.
हिंगोली जिल्ह्यात मागील 6 दिवसांपासून सातत्यानं पाऊस बरसतोय. जिल्ह्यात गुरुवारी सकाळपर्यंत 59.40 मिलिमीटर पावसाची नोंद झालीय. त्यात हिंगोली तालुका 69.40 मिलिमीटर, कळमनुरी 76.10 मिमी, वसमत 49.40 मिमी, औंढा 60.50 मिमी तर सेनगाव तालुक्यात 42.10 मिमी पावसाची नोंद झालीय.
गेल्या 10 दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरु आहे. खरिपातील पिके ही पावसाळ्यातली असली तरी उगवण होताच पिके पाण्यात गेल्याने नुकसान अटळ आहे. बुधवारपासून मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने उसंत घेतली आहे. या दरम्यानच्या काळात शेतकऱ्यांनी शेतामध्ये पाणी साठून राहणार नाही यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. पाण्याचा निचरा करण्यासाठी बांधाकडून चर खोदावी लागणार आहे. त्यामाध्यमातून साठलेले पाणी वावराबाहेर काढले तरी सोयाबीन हे पिवळे पडणार नाही. शिवाय आणखी पाऊस झाला तरी चारीद्वारे पाणी वावराबाहेर येईल. वाफसा होताच सुक्ष्म मुलद्रव्ये व रस शोषण करणाऱ्यां किटकांसाठीची फवारणी करणे गरजेचे असल्याचे लातूरचे कृषी उपविभागीय अधिकारी कदम यांनी सांगितले आहे.