रमेश चेंडके, हिंगोली : समाजात अनेक प्रकारचे लोक आढळतात. कुणी आर्थिकदृष्टीने श्रीमंत असतात तर कुणी मनाने श्रीमंत. पैशांनी श्रीमंत असूनही मनाने श्रीमंत झालेले फार कमी जण असतात. आपली श्रीमंती योग्य ठिकाणी वापरली पाहिजे, अशी जाणीव होणारेही कमीच. पण जे श्रीमंतीचा, किंवा आपल्याकडे असलेल्या सत्तेचा, अधिकारांचा, पैशांचा योग्य वापर करतात, त्यांच्या प्रयत्नांना एक दिवस यश नक्की येतं. हा विचार सांगण्याचं कारण म्हणजे हिंगोलीतील एक स्तुत्य उपक्रम. देशाचं भविष्य उज्ज्वल घडवायचं असेल तर आधी विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे. या विचारातून राजू नवघरे प्रतिष्ठानने पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी खास उपक्रम राबवला.
देशात नवोदय परीक्षा पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना बारावीपर्यंतचे शिक्षण मोफत मिळते. पाचवी आणि नवव्या इयत्तेच्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येते. पण अनेक विद्यार्थ्यांना याबद्दल फार माहिती नसते. तसेच परीक्षेत कसे प्रश्न येतात, उत्तरपत्रिका कशी लिहायची, अशा समस्या असतात. विद्यार्थ्यांच्या या समस्या दूर करण्यासाठी राजू नवघरे प्रतिष्ठानने हिंगोली जिल्ह्यातील वसमत आणि औंढा तालुक्यातील विद्यार्थ्यांनसाठी एक उपक्रम राबवला.
वसमत व औंढा तालुक्यातील पाचवीच्या चार हजार विद्यार्थ्यांची नवोदयसाठीची सराव परीक्षा घेण्यात आली. परीक्षा पॅड सह सोळा पानांची उत्तर पत्रिका चार हजार विद्यार्थ्यांना मोफत देण्यात आली.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षेची भीती दूर व्हावी,स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी यासाठी हा उपक्रम घेण्यात आला.
नवोदय परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना 12 वी पर्यंतचे मोफत शिक्षण मिळते. याचा फायदा ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त व्हावा, या साठी राजु नवघरे प्रतिष्ठानच्या वतीने परीक्षेची पूर्व तयारी म्हणून सराव परीक्षेचं आयोजन करण्यात आले होते. ह्या परीक्षेसाठी वसमत व औंढा तालुक्यातील चार हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला . सर्व विद्यार्थ्यांना प्रतिष्ठानच्या वतीने स्टेशनरीचे सर्व साहित्य मोफत देण्यात आले.महाराष्ट्रातील हा पहिलाच उपक्रम असल्याचं शिक्षक सांगत आहेत.
येत्या 29 एप्रिल 2023 रोजी नवोदयची परीक्षा पार पडणार आहे. त्यात चूका होऊ नये म्हणून ही परीक्षा घेतली जात आहे. वसमत आणि औंढा तालुक्यातील ४ हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे. आता या उत्तरपत्रिका ४०० शिक्षकांच्या माध्यमातून तपासल्या जातील.