हिंगोलीः हिंगोली (Hingoli) ते नरसी नामदेव (Narsi Namdev) मार्गावर राहोली पाटीजवळ अपघाताची घटना घडली. भरधाव कार आणि दुचाकीची धडक होऊन गंभीर अपघात झाला. या घटनेत दोन तरुण ठार (Two died) झाले तर एक जण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. घटनेत गंभीर जखमी असलेल्या रुग्णावर सध्या उपचार सुरु आहेत. रविवारी रात्री 7.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात ज्ञानेश्वर गजानन वाघमारे, विवेक उत्तम भडके, अशी मृत तरुणांची नावं आहे. हा अपघात झाल्यानंतर कार रस्त्यावरून उतरून शिवारापर्यंत गेली. तर दुचाकीचाही चक्काचूर झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथील ज्ञानेश्वर गजानन वाघमारे, विवेक उत्तम भडके व अर्जून मदन भडके हे तिघेजण त्यांच्या दुचाकी वाहनावर हिंगोली येथे आले होते. हिंगोली येथे काम आटोपून ते रात्री साडे सात वाजण्याच्या सुमारास परत गावाकडे निघाले होते. यावेळी हिंगोली ते नरसी नामदेव मार्गावर राहोली पाटीजवळ सेनगावकडून भरधाव वेगानं येणाऱ्या कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात ज्ञानेश्वर व विवेक यांचा जागीच मृत्यू झाला. तर अर्जून मदन भडके हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
या घटनेची माहिती मिळताच हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आर.एन. मळघने, जमादार गजानन पोकळे, अशोक धामणे, आकाश पंडितकर यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमी विवेक यास उपचारासाठी हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र विवेक याची प्रकृती गंभीर असल्यानं त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेडला हलवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी नांदेड पोलीस ठाण्यात रात्रीपर्यंत नोंद झाली नव्हती.