बीडमध्ये मराठ्यांनी एकजुटीने मतदान केलं. म्हणून काहींना त्रास व्हायला लागला आहे. मी शांत आहे, तोपर्यंत शांत आहे. जर समाजाला त्रास देणार असाल तर जश्यास तसे उत्तर देणारच… सरकार आणि मुख्यमंत्री यांना सांगतो जाणून बुजून खोट्या केसेस करत आहेत. सर्वपक्षीय आमदारांना आवाहन करतो, सर्व ओबीसी नेते एकत्रित आले. मराठ्यांना ताकद देण्याची वेळ आहे त्यामुळे सर्व पक्षीय मराठा आमदारांनी एकत्र या…. ओबीसी नेते आरक्षण असून ताकदीने लढत आहेत मग मराठा समाजाला आरक्षण नाही तुम्ही किती ताकदीने लढले पाहिजे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
अजून ज्यांची जिरली नसेल तर त्यांची आगामी काळात जिरवू…. आपल्याविरोधात जे जातील त्यांना पाडायचे म्हणजे पाडायचे. मुस्लिमांना आरक्षण दिलंच पाहिजे. त्यांचे म्हणणे आहे की मुस्लिमांना आरक्षण देता येत नाही. मग बागवानाला आरक्षण दिले ना मागे तो पण मुस्लिम आहे ना… मारवाडी, मुस्लिम, लोहार, रजपूत समाज यांना आरक्षण नाही. राजपूत समाजात एकाला आरक्षण आहे आणि दुसऱ्याला नाही. असं कसं बाबा? एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला एक न्याय असं कसं?, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
माझ्या समाजाचे लेकरं अधिकारी बनले पाहिजे. मला एकच वचन द्या, मला उघडं पडू देऊ नका. यांच्या छातीवर बसून मी आरक्षण देतो. गोरगरीब मराठ्यांना किमत दिली जात नाही. 10 टक्के मराठे श्रीमंत असतील पण 90 टक्के मराठ्यांचे काय? चपलीसाहित तुमच्या पाया पडले पाहिजेत. तुमच्याशिवाय राज्यात पान हाललं नाही पाहिजे, असं मनोज जरांगे म्हणाले.
आगामी काळात 288 उभे करायचे की पाडायचे ते ठरवू. लवकरच याबाबत मिटिंग घेऊयात. तसेच ओबीसी नेता आपल्याविरोधात बोलला तर त्या ओबीसी नेत्याला पाडायचे म्हणजे पाडायचं. जो मराठा समाजाला त्रास दिला तर त्याला पाडायचं म्हणजे पाडायचं, असा निर्धार जरांगे पाटील यांनी बोलून दाखवला.