हिंगोलीः हिंगोलीतील प्रमुख रस्त्यांवर आज शुकशुकाट पहायला मिळतोय. शहरातील प्रमुख व्यापारी बाजारपेठाही बंद दिसतायत. कोणतंही राजकीय आंदोलन नाही ना दिवसा कर्फ्यू नाही, मग हा बंद कशामुळे आहे, असा प्रश्न पडला आहे. तर हा बंद आहे वाढत्या गुन्हेगारीचा निषेध करण्यासाठी. हिंगोली जिल्ह्यात गुन्हेगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलंय, मागच्या काही महिन्यांपासून तर दिवसा ढवळ्या लूटमार, चोऱ्या सुरु आहेत. चोरांनी दुकानंच्या दुकानं लुटून नेलीत. या वाढत्या गुन्हेगारीच्या विरोधात आवाज उठवण्याचं व्यापारी महासंघानं ठरवलं आणि आज व्यापारी बाजारपेठ बंद ठेवण्याचं आवाहन केलं.
जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून लूटमार, जबरी चोरी, दरोड्याच्या घडना घडत आहेत. चोरटे राजरोसपणे चोऱ्या, घरफोड्या करीत असताना पोलिसांना चोरटे का सापडत नाहीयेत, असा सवाल नागरिक व व्यापारी वर्गातून केला जात आहे. पोलिसांच्या कामगिरीवरच नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे. या चोरीच्या घटनांना आवर घालण्यासाठी हिंगोली येथील व्यापारी महासंघानं आज हिंगोली बंदची हाक दिली. या बंदला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत, आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली.
कळमनुरी येथील दत्तगुरी फार्मचे मालक तानाजी शिंदे हे फार्म कंपनी बंद करून घरी जात होते. चोरट्यांनी त्यांचा रस्ता अडवून त्यांना महामार्गावर लुटण्याचा प्रयत्न केला. शिंदे यांच्या दुचाकीवर लाथ मारून चोरट्यांनी पळ काढला. सदरची घटना ही बुधवारी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास घडील. हिंगोली कळमनुरी रोडवरील शिवणी परिसरात या घटनेमुळे चांगलीच दहशत पसरली आहे.
दुसऱ्या एका घटनेत हिंगोली शहरातील नवा मोंढा भागात असलेल्या व्यंकटेश्वरा हार्डवेअरमध्ये चोरटा लॉक तोडून शिरला. दोन तास त्याने दुकानात शोधाशोध केली. 12 हजारांचा ऐवज चोरून निघून गेला. पोलिस ठाण्यापासून काही अंतरावर घडलेल्या या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज ही आहे. तरीही पोलिसांच्या हाती अजून चोर सापडले नाहीत. त्यामुळे व्यापारी वर्गाकडून या प्रकाराचा निषेध केला जात आहे.
इतर बातम्या-