Hingoli Accident : विद्यार्थ्यांना घेऊन शाळेत चालली होती बस, वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले अन्…

| Updated on: Aug 09, 2023 | 1:56 PM

नेहमीप्रमाणे स्कूल बस विद्यार्थ्यांना घेऊन शाळेच चालली होती. मात्र शाळेच पोहचण्याआधीच बसला अपघात झाला.

Hingoli Accident : विद्यार्थ्यांना घेऊन शाळेत चालली होती बस, वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले अन्...
हिगोलीत स्कूल बसला अपघात, आठ विद्यार्थी जखमी
Image Credit source: TV9
Follow us on

हिंगोली / 9 ऑगस्ट 2023 : शाळेत विद्यार्थी घेऊन चाललेल्या स्कूल बसला वसमत तालुक्यातील बाभूळगाव ते वाखारी मार्गावर अपघात झाल्याची घटना घडली. स्कूल बस पलटी होऊन 8 विद्यार्थी जखमी झाले आहेत. सदर सर्व विद्यार्थी वसमतच्या युनिव्हर्सल इंग्लिश स्कुलचे आहेत. जखमी विद्यार्थ्यांवर वसमत येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बस चालकाच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाल्याचा पालकांचा आरोप आहे. अपघाताची घटना घडताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले. घटनेनंतर बस चालक घटनास्थळाहून फरार झाला आहे.

काय घडलं नेमकं?

वसमत येथील युनीव्हर्सल इंग्लीश स्कूल शाळेची मुलं घेऊन नेहमीप्रमाणे स्कूल बस शाळेकडे निघाली. वसमत शहरासह ग्रामीण भागातील 30 ते 35 विद्यार्थी बसने शाळेत जातात. बाभूळगाव ते वाखारी मार्गावर येताच वळणावर चालकाने अचानक ब्रेक लावला. यानंतर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाली. यात बसमधील आठ विद्यार्थी जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले. बसमधील सर्व विद्यार्थ्यांना बाहेर काढले. स्थानिक आमदार राजेश नवघरे यांनीही अपघाताची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दोन रुग्णवाहिका उपलब्ध करून अपघातात जखमी झालेल्या आठ विद्यार्थ्यांना उपचारासाठी वसमत येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हे सुद्धा वाचा

वाहन चालकाचा निष्काळजीपणा या अपघाताला कारणीभूत असल्याचा पालकांनी आरोप केला आहे. बसला अपघात होताच चालकाने तेथून पळ काढला. या घटनेची गांभीर्याने दखल घेत हिंगोलीच्या परिवहन विभागाने जिल्ह्यात सुरू असलेल्या स्कूल बसची पाहणी करावी आणि सदर बसेस विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यास सुरक्षित आहेत का? याची तपासणी करणे गरजेचे आहे.