हिंगोली : उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंगोलीमधील सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री यांच्यावरही निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांनी याआधी फडणवीसांवर टीका करताना फडतूस आणि कलंक असा उल्लेख केला होता. त्यानंतर फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं होतं. आजच्या सभेमध्ये पुन्हा एकदा या दोन्ही शब्दांचा उल्लेख करत आणखी एक शब्द वापरत त्यांच्यावर टीका केली.
आता मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबद्दल बोलायचं सोडून दिलं आहे. कारण काही बोललो तरी त्याचा बोभाटा होता, मी एकदा फडतूस बोललो होतो पण आता नाही बोलणार, कलंक बोललो होतो पण आता नाही बोलणार, आता थापाड्या बोलायचो होतो पण आता नाही बोलणार, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर निशाणा साधला.
फडणवीस जपानला गेले आणि म्हटले उद्योग आणणार म्हटले पण जपानपेक्षा गुजरात जवळ आहे. त्यामुळे गुजरातला गेलेले उद्योग तुम्ही आणू शकता का? नेहमी आपलं सांगितलं जातं की,मोदींनी सांगितलंय याच्यापेक्षा मोठा उद्योग तुम्हाला देऊ, अरे कुठाय उद्योग सगळ्या थापा थापा आणि खापा. जेव्हा सरकार तुमच्या दारात येईल तेव्हा होऊन जाऊदे चर्चा, प्रत्येक गावामध्ये, वाडीवरती, शेताच्या बांधावरती सर्वांना विचारा सरकारच्या या योजनेचा तुम्हाला लाभ मिळाला का हे विचारा, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान, इतर पक्षांचे नेते चोरणार आम्ही हिंदू आहोत आमची ताकद पाहा, कसली डोंबल्याची ताकद याला नामर्द म्हणतात. स्वत:कडे ना कोणता विचार ना आचार. कोणाचीही दादागिरी सहन करणार नाही. सरकार आपल्या दारी थापा मारतंय लय भारी, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.