मुंबई : जोगेंद्र कवाडे यांच्या पिपल्स रिपब्लिकन पार्टी (People’s Republican Party) यांच्या पक्षानं बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत युती करण्याचा निर्णय घेतला. हे सामान्य लोकांचं सरकार आहे. अशी भावना व्यक्त करून आज भूमिका जाहीर केली आहे. संघर्षातून पुढं आलेले दोन्ही पक्ष आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Shinde) यांनी दिली. दोन्ही पक्षांचा संघर्ष साधा-सोपा नव्हता. कवाडे हे सुशिक्षित व अभ्यासू नेता आहेत. त्यांच्या आंदोलनाच्या काळात लोकांना न्याय देण्याची भूमिका घेतली. एकेकाळी कवाडे यांच्या भाषणांवर बंदी होती. यावरून किती आक्रमकतेने ते विषय मांडत हे लक्षात येते. लोकांच्या अन्यायाला न्याय देण्याचं काम ते करायचे. त्यांची आक्रमकता भल्याभल्यांना घाम फोडायची, असंही शिंदे यांनी सांगितलं.
जोगेंद्र कवाडे यांनी सोशित, पीडित, दलित समाजाला न्याय मिळवून दिला. पोलिसांच्या लाठ्याकाठ्या खाल्या. ओबीसींच्या प्रश्नावर ते तिहार जेलमध्येही होते. एकंदरित त्यांचे आंदोलन देशव्यापी होतं.
आम्हालाही बाळासाहेबांची तीचं शिकवण आहे. लोकांना न्याय देण्यासाठी आंदोलनं केलीत. लाठ्या-काठ्या आम्हीसुद्धा खाल्या. संघर्षातून आम्ही इथपर्यंत आलोत. लोकांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरणारे आम्ही आहोत, असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
लोकांच्या प्रश्नासाठी निर्णय घेणारे पक्ष आहेत. जगातला तिसरा लाँगमार्च जोगेंद्र कवाडे यांनी काढला होता. आम्ही घेतलेल्या भूमिकेला वैचारिक अधिष्ठान आहे. सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम करतोय. या राज्यातील सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम करू. राज्यातील सर्व घटकांना न्याय देण्याचं काम करणार असल्याचंही एकनाथ शिंदे म्हणाले.