मुंबई : केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे दिग्गज अमित शाह (Amit Shah) यांच्या मुंबई दौऱ्यावरून राजकीय घडामोडींना वेग आलाय. मुंबई महापालिकेवर (BMC Election) यंदा भाजपचाच झेंडा फडकवायचा, असा चंग भाजपने बांधलाय. तर कोणत्याही स्थितीत शिवसेनेचा हा गड राखायचाच, असा पण ठाकरे गटानं केलाय. अमित शाह यांच्या दौऱ्यामुळे ठाकरे गटाला धडकी बसली आहे, अशी खोचक टीका भाजपकडून करण्यात येतेय. तर अमित शहांच्या दौऱ्यावरून उद्धव ठाकरेंना डिवचण्याची एकही संधी भाजपकडून सोडली जात नाहीये. मातोश्रीबाहेर पडताच या परिसरात अमित शाह यांचे स्वागत करणारे मोठे बॅनर तथा पोस्टर्स झळकवण्यात आले आहेत. अमित शहांच्या स्वागतासाठी मुंबईत जोरदार तयारी केली जातेय, मात्र ती करतानाच उद्धव ठाकरे यांनाही टार्गेट केलं जातंय.
केंद्रीय सहकार आणि गृहमंत्री अमित शहा हे दोन दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या स्वागतार्थ मातोश्री परिसरामध्ये लागले बॅनर आणि होर्डिंग लागले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांचे बॅनर वर फोटो झळकवण्यात आले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीबाहेरच हे बॅनर्स लावल्याने त्यांची जास्त चर्चा होतेय.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज शनिवारी संध्याकाळी मुंबईत दाखल होणार आहेत. संध्याकाळी 7 वाजता त्यांचे आगमन होईल. रात्री उशीरापर्यंत ते सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आदी नेत्यांसोबत चर्चा करतील. तसेच इतर भाजपच्या नेत्यांनाही त्यांनी भेटीसाठी वेळ दिला आहे. उद्या रविवारी ज्येष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. अमित शाह यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण होईल. नवी मुंबईतील खारघर येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सकाळी 10.30 वाजता हा सोहळा पार पडेल.
अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्ताने अमित शाह मुंबईत येत आहेत. मात्र शहांच्या दौऱ्यात काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. सत्ता संघर्षाचा सुप्रीम कोर्टातील निकाल येत्या मे महिन्यात लागण्याची शक्यता आहे. शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरल्यास भाजपचा प्लॅन बी काय आहे, यावर महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच या प्लॅनची जबाबदारी कुणावर द्यायची हेदेखील या बैठकीत निश्चित होऊ शकतं. मुंबई महापालिका निवडणुकांच्या अनुशंगानेही महत्त्वाची रणनीती आखली जाऊ शकते. तर भाजप-मनसे युतीवरूनही विचारमंथन होण्याची शक्यता आहे. एकूणच अमित शाह यांच्या दौऱ्यात नेमकं काय घडतं, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.