गृहनिर्माण विभागाकडून गृहनिर्माण धोरणाबाबत काही मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. गृहनिर्माण विभागाकडून आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये प्रेझेंटेशन करण्यात आलं, त्यामध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे. ज्यामध्ये परवडणाऱ्या पर्यावरणपूरक गृहनिर्माण धोरणाला चालाना, ज्येष्ठ नागरिकांसाठी गृहनिर्माण धोरण, परवडणारे रेंटल हाऊसिंग तसेच गिरणी कामगारांसाठी १ लाख घरं बांधणीचं टार्गेट यासंदर्भात आज गृहनिर्माण विभागाकडून सादरीकरण करण्यात आलं आहे. पुढच्या महिन्यात याबाबत सविस्तर धोरण तयार होणार आहे.
सादरीकरणामध्ये कोणते मुद्दे मांडण्यात आले.
गृहनिर्माण विभागाकडून आज गृहनिर्माण धोरणासंर्भात सादरीकरण करण्यात आलं. ज्यामध्ये परवडणाऱ्या पर्यावरणपूरक गृहनिर्माण धोरणाला चालना, ज्येष्ठ नागरिकांसाठी गृहनिर्माण धोरण, परवडणारी रेंटल हाऊसिंग, गिरणी कामगारांसाठी १ लाख घरं बांधणीचं टार्गेट यासंदर्भातील मुद्दे मांडण्यात आले. दरम्यान या संदर्भात पुढच्या महिन्यात सविस्तर धोरण तयार होणार असून, ज्येष्ठ नागरिकांसाठी गृहनिर्माण धोरण राबविणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरणार आहे.
गिरणी कामगारांसाठी १ लाख घरं बांधणीचं टार्गेट
दरम्यान गिरणी कामगारांसाठी एक लाख घरं बांधणीचं टार्गेट ठेवण्यात आलं आहे. त्यासाठी दोन निविदा प्राप्त झाल्या आहेत. लवकरच त्याबाबतचा निर्णय होणार आहे. जे गिरणी कामगार महाराष्ट्रातल्या मुळ गावी स्थलांतरित झाले आहेत त्यांना तिथेच घरं देता येतील का याची चाचपणी करण्याचे निर्देश देखील गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहनिर्माण विभागाला दिले आहेत.
दरम्यान आजच्या बैठकीत सादर करण्यात आलेल्या प्रेझेंटेशनमध्ये इंग्रजी स्लाइडचा वापर करण्यात आला. यावर एकनाथ शिंदे यांनी आक्षेप घेतला, व मराठी स्लाईडबाबत विचारणार केली. मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झालेला आहे, हे लक्षात आहेत ना? अशी विचारणा उपमुख्यमंत्र्यांनी हसत हसत केली. त्यानंतर लगेचच मराठी स्लाइड पडद्यावर आली . २००७ नंतर गृहनिर्माण धोरणच तयार झालं नव्हतं, ते आता करण्यात येत आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि गिरणी कामगारांना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.