मुंबई | 25 ऑक्टोंबर 2023 : शिवाजीपार्क येथे दसरा मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली होती. उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या कुटुंबाचा विषय काढला होता. त्यावरून भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना इशारा दिलाय. यापुढे पंतप्रधानांचा एकेरी उल्लेख केला तर आमचे नेतेही तुमचा अपमान करतील. तो अपमान सहन करण्याची तयारी ठेवा, असा इशारा भाजप नेत्यांनी दिला आहे. हा विषय तुम्ही काढलाच आहे तर काही प्रश्नाची उत्तरे तुम्हालाही द्यावे लागतील, असा टोलाही त्यांनी लगावला.
भाजप नेते आणि मुंबई प्रदेश अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केलीय. उद्धव ठाकरे यांचे काल दसरा मेळाव्यात भाषण झाले. उध्दव ठाकरे म्हणजे पोकळ शब्दांचे खोडकळ नेते आहेत हे त्यावरून स्पष्ट झाले. आम्ही “मेरी माटी, मेरा देशवाले” आहोत. तुमच्यासारखे “माझे कुटुंब माझी जबाबदारी” वाले नाही, असा टोला त्यांनी लगावला.
उद्धव ठाकरे यांची मागची दहा वर्षातील भाषणे आमच्या बॅक आँफीसने काल काढली. त्यातून एक आश्चर्यकारक माहिती समोर आली. ठाकरे यांनी गेल्या दहा वर्षात 1 हजार 531 घोषणा केल्या. विशेष म्हणजे करणार म्हणजे करणारच….! आरक्षण देणार म्हणजे देणारच… शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार म्हणजे करणारच…! शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार म्हणजे करणारच..! महापालिकेवर भगवा फडकवणार म्हणजे फडकवणारच…! अशा प्रकारच्या त्या घोषणा आहेत. गेल्या 10 वर्षात केलेल्या त्या घोषणांचे पुढे काय झाले? यावरून त्यांच्या शब्दाला किंमत नाही हे स्पष्ट होते, अशी टीका शेलार यांनी केली.
उद्धव ठाकरे यांची मुंबई महापालिकेत सत्ता होती. अनेक ग्रामपंचायतीमध्ये सत्ता होती. खासदार, आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समितीचे सदस्य, सरपंच सगळे पक्ष सोडून गेले आणि आणखीही जात आहेत. असलेली सत्ता जाण्याची वेळ आली. तरीही तुम्हाला महाराष्ट्रात आणि देशात सत्ता येणार अशी स्वप्न पडू लागली. परंतु, तुमची ग्रामपंचायतीमध्ये असलेली सत्ता तरी टिकेल का? असा सवाल शेलार यांनी केला.
बुलेट ट्रेन, मेट्रो, मेट्रो कारशेड, कोस्टल रोड, समृद्धी महामार्ग, नवे विमानतळ, जैतापूर प्रकल्प, वाढवण बंदर अशा प्रत्येक प्रकल्पाला आपण विरोध केला. हे तुम्ही कालच्या सभेत जाहीरपणे सांगितले. मग आणखी एक सांगा उध्दवजी, तुमच्या वहिनीसोबत तुमचे भांडण आहे की कौटुंबिक नाते? वडिलांची मालमत्ता एकट्याने हडप केली. यासाठी सख्या भावाविरोधात तुम्ही न्यायालयात लढला की नाही? चुलत भावाला घराबाहेर, पक्षातून बाहेर काढले. याचा आनंद मिळाला की नाही? बरेच विषय निघतील त्यामुळे आमचे पंतप्रधान यांच्या कुटुंबावर बोलू नका असा इशारा शेलार यांनी दिला.