नव्या मंत्रिमंडळामध्ये शिवसेना शिंदे गटाचे किती मंत्री? बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितलं

| Updated on: Dec 08, 2024 | 3:57 PM

गुरुवारी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला. आता संपूर्ण राज्याचं लक्ष मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागलं आहे. नव्या मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

नव्या मंत्रिमंडळामध्ये शिवसेना शिंदे गटाचे किती मंत्री? बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितलं
Follow us on

राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. महायुतीमधील प्रमुख घटक पक्ष भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या एकूण 232 जागा आल्या, तर दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीला मोठा फटका बसला. मविआला विधानसभा निवडणुकीत केवळ 50 जागाच जिंकता आल्या. दरम्यान त्यानंतर गुरुवारी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची देखील उपस्थिती होती.

दरम्यान आता मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर सर्वांनाच वेध लागले आहेत ते म्हणजे मंत्रिमंडळ विस्ताराचे. मंत्रिपदासाठी तीनही पक्षातील अनेक आमदार इच्छूक आहेत. त्यामुळे मंत्रिपद कोणाला मिळणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच शिवसेना शिंदे गटाला आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला नव्या मंत्रिमंडळात किती मंत्रिपद मिळणार? याबाबत देखील उत्सुकता निर्माण झाली आहे.

याबाबत बोलताना शिवसेना शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी मोठा खुलासा केला आहे. मंत्रिमंडळात कोणाला घ्यायचं याचा निर्णय घेण्याचे सर्व अधिकार आमदारांनी पहिल्याच बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांना दिले आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळात कोणाला घ्यायचं याबाबत एकनाथ शिंदे हे निर्णय घेतील. ते जो निर्णय घेतील तो निर्णय सर्व शिवसैनिकांना, आमदारांना आणि नेत्यांना मान्य असेल असं शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे. तसेच मंत्र्यांचा शपथविधी येत्या 12 तारखेला होईल असं देखील देसाई यांनी म्हटलं आहे.

नव्या मंत्रिमंडळात कोणाला संधी? 

दरम्यान आता लवकरच नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. राज्यात सर्वाधिक जागा जिंकून भाजप नंबर एकचा पक्ष ठरला आहे. भाजपनं तब्बल 131 जागा जिंकल्या त्यानंतर शिवसेना शिंदे गटाला 57 तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्या आहेत. आपल्यालाही मंत्रिपद मिळावं यासाठी या तिनही पक्षातील अनेक आमदार इच्छूक आहेत. त्यामुळे आता मंत्रिपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार? कोणाला कोणतं खातं मिळणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.