मुंबई : शिवसेना आमदार संजय राठोड(Sanjay Rathod) यांना मंत्रीपद दिल्याने भाजप नेत्या चित्रा वाघ(Chitra Wagh) चांगल्याच आक्रमक झाल्या आहे. मंगळवारी शपथविधी झाल्यानंतर “पूजा चव्हाणच्या मृत्युला कारणीभूत असणाऱ्या माजी मंत्री संजय राठोडला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं, हे अत्यंत दुदैवी आहे असं ट्विट करत चित्रा वाघ यांनी थेटपणे आपला संताप व्यक्त केला. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रतिक्रिया दिली. संजय राठोड यांना महाविकास आघाडी सरकारने क्लीन चिट दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. यावर आता चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. संजय राठोड यांना क्लीनचीट कशी दिली? असा सवालच चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde) यांना विचारला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळावरी संजय राठोड यांना क्लीनचीट दिल्याचे वक्तव्य केलं होत. या तिघा चौघांना विचारायला हवं की क्लीनचीट कशी दिली ? असं चित्रा वाघ म्हणाल्या. पी आय एल दाखल झाली आहे. दोन तारखा सुद्धा झाल्या आहेत. राठोडांना क्लीनचीट ही ठाकरे सरकारने दिली होती. ज्यांनी क्लिनचीट दिली त्यांनाही विचारायला हवं म्हणून मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री , गृहमंत्री आणि पुण्याच्या पोलीस आयुक्तांना विचारायला हवं की क्लीनचीट कशी दिली? अस म्हणत चित्रा वाघ यांनी पून्हा एकदा आपली आक्रमक भूमिका मांडली.
सगळ्यात मोठी लढाई ही न्यायालयाची आहे. एका मुलीच्या आत्महत्येला कारणीभूत असणाऱ्या राठोडांविरोधात माझा लढा सुरू आहे. लढेंगे आणि जितेंगे अशी प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली आहे.
बीडमधील परळी येथील टिक टॉक स्टार पूजा चव्हाण या तरुणीने आत्महत्या केलेली. तिनं पुण्यात आत्महत्या केल्यानं एकच खळबळ उडालेली. तेव्हा तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांच्यावर पूजा चव्हाण या तरुणीच्या मृत्यूप्रकरणी गंभीर आरोप करण्यात आलेले होते. या आरोपानंतर संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता. यावेळी पूजा चव्हाणच्या कॉल रेकॉर्डिंगही व्हायरल झाल्या होत्या. त्यातील आवाज संजय राठोड यांचा असल्याचा आरोप केला जात होता. यानंतर संजय राठोड कुटुंबासह नॉट रिचेबल झालेले. काही काळानंतर ते पुन्हा बंजारा समाजातील कार्यक्रमांमध्ये सक्रिय झाले. अखेरीस पुण्यातील वानवडी पोलिसांनी पूजा चव्हाण हिचा मृत्यू घातपात नसल्याचा खुलासा केला होता. पुजाचा अपघाती मृत्यू झाला असल्याचा खुलासा पोलिसांनी केल्यानंतर संजय राठोड यांना दिलासा मिळाला होता.