विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच जाहीर केलं होतं. दरम्यान या पार्श्वभूमीवर आज अंतरवाली सराटीमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला बौद्ध आणि मुस्लीम धर्मगुरुंची उपस्थिती होती. या बैठकीनंतर आम्ही मराठा, बौद्ध आणि मुस्लीम एकत्र आलो असून, सामीकरण जुळल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. तसेच ही बौठक संपल्यानंतर त्यांनी मराठा, मुस्लीम आणि दलीत बांधवांना निवडणुकीसंदर्भात महत्त्वाचं आवाहन केलं आहे.
नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील?
माझा एक सवाल आहे. आमचं ठरलं आहे. जनतेसाठी आनंदाची बातमी आहे. जिथे मराठा उमेदवार दिला जाणार तिथे ताकदीने मुस्लिम आणि दलित बांधव मतदान करणार आहेत. हे सर्व जातीच्या लोकांनी लक्षात ठेवा. जिथे बौद्ध उमेदवार किंवा राखीव वर्गातील उमेदवार असेल त्याला मुस्लिम आणि मराठा मतदारांनी ताकदीने मतदान करायचं. क्रॉस व्होटिंग करायचं नाही. जिथे मुस्लिम उमेदवार असेल तिथे दलित आणि मराठा क्रॉस मतदान करायचं नाही. ताकदीने मतदान करायचं आहे. दलित, मराठा आणि मुस्लिमांनी आता ताकदीने बाहेर पडायचं आहे. कितीही काही झालं तरी संयम बाळगायचा आहे.
दलित, मुस्लिम आणि मराठ्यांनी १०० टक्के मतदान करायचं आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात आम्ही सभा घेणार आहोत. सभेच्या दिवशीही एकाही दलित, मराठा, मुस्लिमांनी घरी राह्यचं नाही. अंतरवलीत ४ तारखेपर्यंत येऊ नका. मला कार्यक्रम ठरवायचा आहे. उमेदवार ठरवायचे आहेत. दलित, मराठा आणि मुस्लिमांना आमदार होऊ द्या. मग काय फोटो काढायचे ते काढा. पण आता मला काम करू द्या. तुम्ही या उठावात सामील व्हा. मला दोन चार दिवस मोकळं ठेवा. यांचा कार्यक्रमच लावतो.
निवडणुकीत अभ्यासक असलेल्या बांधवांनी मनाने यावं. आमंत्रणाची वाट पाहू नका. तुमची सर्वांची गरज आहे. बौद्ध भिक्खुंनी आपला संदेश जनतेपर्यंत द्यावा, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.