Nashik News : सण उत्सव काळात खरंतर पोलीस अधिकाऱ्यांना (Police Officer) कर्तव्य बजवावे लागत असते, त्यामुळे त्यांची कुटुंबा समवेतची दिवाळी अनेकदा साजरी होतच नाही. मात्र, नाशिकच्या ग्रामीण पोलीस (Nashik Rural Police) दलातील एका अधिकाऱ्याने केलेलं दिवाळी सेलिब्रेशनचं (Diwali) कौतुक होत आहे. मुस्लिम अधिकारी असलेले सायखेडा पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक पी वाय कादरी यांनी हे दिवाळी सेलिब्रेशन केले आहे. यामध्ये विशेष म्हणजे सैनिकांचे गाव म्हणून ओळख असलेल्या निफाड तालुक्यातील महाजनपूर भेंडाळी येथील जवान रंगनाथ पवार हे दिनांक १५ ऑगस्ट २०२२ रोजी राज्यस्थान येथे कर्तव्यावर असतांना शहीद झाले होते. त्यांच्या घरी जात कादरी यांनी दिवाळी सेलिब्रेशन केले आहे. देशासाठी प्राण गमावलेल्या जवानाच्या घरी दिवाळी सणाची गंधवार्ताही नव्हती, मात्र याच कुटुंबासोबत दिवाळी साजरी केली तर त्यांचे दुःख काही प्रमाणात कमी होऊन त्यांना काही अंश आनंद मिळेल अशी भावना ठेऊन पोलीस अधिकारी कादरी यांनी घेतलेला पुढाकार चर्चेचा विषय ठरला आहे.
सैनिकांचे गाव म्हणून ओळख असलेल्या निफाड तालुक्यातील महाजनपूर-भेंडाळी या गावाची ओळख आहे. तेथील जवान रंगनाथ पवार हे दिनांक १५ ऑगस्ट २०२२ रोजी राज्यस्थानमध्ये शहीद झाले होते.
शहीद जवान रंगनाथ पवार यांच्या घरी जात आई ताराबाई आणि वडील वामन असे कुटुंब आहे. त्यांना नवीन कपडे सोबत मिठाई देत आस्थेने चौकशी करत कादरी यांनी धीर देण्याचे काम केले आहे.
सायखेडा पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक पी वाय कादरी यांनी पवार कुटुंबाच्या घरी जाऊन दिवाळी साजरी केल्याने खाकीच्या आड दडलेल्या माणुसकीचे दर्शन यानिमित्ताने झाले आहे.
कादरी यांनी आस्थेने केलेली चौकशी आणि केलेल दिवाळी सेलिब्रेशन पोलीस दलातही चर्चेचा विषय ठरत असून कादरी यांच्या या पुढाकाराने गावकरी त्यांचे कौतुक करत आहे.
अनेकदा पोलीस कर्मचारी हे पोलीस ठाण्यात किंवा जिथे कर्तव्य बजावत आहे तिथेच दिवाळी साजरी करून कर्तव्य पार पाडत असतात, मात्र धार्मिकतेचे आणि माणुसकीचे दर्शन भेंडाळी गावात घडल्याने विशेष कौतुक केले जात आहे.