बीड : नोकरीनिमित्त अमेरिकेत (America) वास्तव्यास असलेल्या अंबाजोगाई येथील तरूण दाम्पत्याचा बुधवारी (7 एप्रिल) रात्री संशयास्पद मृत्यू झाला आहे. या पती-पत्नीचे मृतदेह त्यांच्या राहत्या घरी आढळून आल्याने खळबळ एकच उडाली आहे. या दाम्पत्याने आत्महत्या केली की त्यांचा खून झाला हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. या दाम्पत्याची चार वर्षीय मुलगी मात्र सुखरूप आहे. (husband and wife from Beed Ambajogai who lives in America suspiciously found dead)
मिळालेल्या माहितीनुसार नोकरीच्या निमित्ताने अमेरिकेत गेलेल्या अंबाजोगाई येथील तरुण दाम्पत्याचे अमेरिकेत मृतदेह आढळून आले आहेत. बालाजी भारत रूद्रवार (वय 32) आणि आरती बालाजी रूद्रवार (वय ३०) असे मृत्यू झालेल्या पती-पत्नीचे नावे आहेत. मृत बालाजी रुद्रवार हे अंबाजोगाईतील प्रसिद्ध व्यापारी भारत रूद्रवार यांचा मुलगा होता. आयटी कंपनीतील नोकरीच्या निमित्ताने बालाजी हे सहा वर्षापूर्वी अमेरिकेत न्यू जर्सीमधील अर्लिंग्टन भागात कुटुंबासह स्थायिक झाले होते.
स्थानिक वेळेनुसार बुधवारी सायंकाळी त्यांची चार वर्षीय मुलगी विहा गॅलरीत बराच वेळ एकटीच रडत थांबल्याचे दिसून आल्याने शेजाऱ्यांना संशय आला. हा प्रकार लक्षात येताच शेजाऱ्यांनी तेथील पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलिसांनी भेट दिली असता घरात बालाजी आणि आरती यांचे मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आले. भारतीय वेळेनुसार गुरूवारी (दि.8) सकाळी 9 वाजता तिथल्या पोलिसांनी या घटनेबाबत भारत रूद्रवार यांना फोनवरून माहिती दिली. या घटनेमुळे रूद्रवार कुटुंबीय मानसिक धक्क्यात आहे. मृत आरती रुद्रवार या गर्भवती होत्या अशी माहिती मिळत आहे.
दरम्यान, रूद्रवार दाम्पत्याच्या मृत्यू नेमका कशामुळे झाला?, याचे नेमके कारण समजू शकले नाही. तिकडे सकाळ झाल्यानंतर शवविच्छेदनानंतरच या दाम्पत्याने आत्महत्या केली किंवा त्यांचा खून झाला हे स्पष्ट होऊ शकणार आहे. या घटनेतंतर चार वर्षीय चिमुकली विहा मात्र सुखरूप असून सध्या तिला शेजाऱ्यांकडे सोपविण्यात आले आहे.
इतर बातम्या :
पाच वर्षांपूर्वी एकमेकांना शेवटपर्यंत साथ देण्याचं वचन, तरीही शुल्लक कारणावरुन पत्नीवर गोळी झाडली
फांदी मोडली, कौमार्य चाचणीत नवविवाहिता नापास, वरबंधूंनी लग्न मोडलं!
जेबी नगर लोकेशनवरुन दुवा जुळला, एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा NIA च्या रडारवर
(husband and wife from Beed Ambajogai who lives in America suspiciously found dead)