मिरज: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) हे नास्तिक असल्याचा दावा केला होता. पवार हे देव मानत नाहीत. ते नास्तिक आहेत. असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. त्यावर राष्ट्रवादीकडून राज यांना उत्तरही देण्यात आलं होतं. मात्र, आता खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते नास्तिक असल्याची कबुली दिली आहे. विठ्ठल पाटलांच्या मनात एक खंत आहे की बाकीचे सर्व पुढे गेले पण मीच कसा मागे राहिलो. मी खरंच सांगतो. राजकीय जीवनात कष्ट घ्यावेच लागतात. प्रयत्न करावेच लागतात. पण नशिबाचीही साथ असावी लागते. लक फॅक्टरही महत्त्वाचा आहे. मी तर तसा नास्तिक आहे. कुणी तरी मला सांगितलं ही कुलदैवत जागृत आहे. आपली परंपरा, हिंदु संस्कृती,. आपल्या महाराष्ट्राची परंपरा म्हणून मी तिथे जातो, असं अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले. अजित पवार सांगली दौऱ्यावर आहेत. मिरज येथे एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही कबुली दिली.
काम करताना काही गोष्टीत कितीही स्पष्ट बोलावसं वाटत असलं तरी त्यातून काही अडचणी निर्माण होणार असतील तर ते बोलण्याच्या नादी लागू नका. त्याचा खूप फटका बसतो. मी तर खूप अनुभवलंय. एखादा शब्द तोंडून चुकून गेला तर चव्हाण साहेबांच्या समाधी समोर दिवसभर बसावं लागतं. त्यामुळे फार तोलूनमापून बोला. हे सतत लक्षात ठेवा, असा मोलचा सल्लाही अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला.
अलीकडच्या काळात तरुणांमध्ये वाचनाची सवय कमी होत आहे. तरुणांच्या हातात मोबाईल आला आहे. थोडकीच माहिती मिळाली पाहिजे. समाज काळानुसार बदलत आहे. जयंत पाटील म्हणाले अजित पवार यांना सवय आहे हे खरं आहे. जेवढ देता येईल तेवढेच मी बोलत असतो. या समाजासाठी जे काही देता येईल त्यात मी कमी पडणार नाही. जैन समाजामध्ये अल्पभूधारक अनेकजण झाले आहेत. शेती कमी झाली आहे, असं त्यांनी सांगितलं.
आम्ही सत्तेवर आलो. 2 लाख शेतकऱ्याचं पीक कर्ज माफ केले. वेळेवर परत फेड करणाऱ्यांना 50 हजाराची सवलत देण्यास सांगितले. पण कोरोनाच्या काळात ते अंमलात आणता आले नाही. पण आता त्याची यादी मागवून ते देण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण या भारतात राहत असताना जर दुसऱ्या राज्यात काही वेगळे देत असतीलही. पण हा महाराष्ट्र आहे. याठिकाणी महाराष्ट्र कुठे मागे राहणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
आज देश्यात आणि राज्यात जातीजातीत आणि धर्मात तेढ निर्माण करण्याचे काम सुरू आहे. भावनिक मुद्दा काढून तेढ निर्माण करण्याचे हे महाराष्ट्राला परवडणारे नाही. सरकार येतील, सरकार जातील पण त्याचा वापर योग्य रितीने करणे गरजेचे आहे. सर्व समाजाला एकसंघ घेऊन जाण्याची गरज आहे. फार गरीब लोक आहेत. त्यांना पुढे आणण्यासाठी महाराष्ट्र सरकार काही तरी निर्णय घेईल हे पुढे तुम्हाला समजेल. महाविकास आघाडी सरकार सर्वाचं आहे. ते दाखवण्याचा आम्ही कृतीतून करून दाखवतो, असं त्यांनी स्पष्ट केलं.