मी कुठेच नसलो तरी सगळीकडे आहे; शरद पवार यांचं सूचक विधान

| Updated on: Nov 16, 2023 | 6:08 PM

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुन्हा एकदा दौरे सुरू केला आहेत. तब्येतीच्या कारणामुळे मागच्या आठवड्यात शरद पवार सोलापुरात आले नव्हते. त्यामुळे पवार आज सोलापुरात आले. यावेळी त्यांनी शेतकरी मेळाव्याला संबोधित केलं. पवार यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच शेतकऱ्यांना त्यांचे प्रश्न सोडवण्याची ग्वाहीही यावेळी दिली.

मी कुठेच नसलो तरी सगळीकडे आहे; शरद पवार यांचं सूचक विधान
sharad pawar
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

सागर सुरवासे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, सोलापूर | 16 नोव्हेंबर 2023 : राष्ट्रवादीचे सर्वसर्वा शरद पवार यांनी आज एक अत्यंत महत्त्वाचं आणि सूचक विधान केलं आहे. सोलापुरात एका कार्यक्रमात त्यांनी हे विधान केलं आहे. शरद पवार यांच्या या विधानामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. त्यांच्या या विधानांचा राजकीय अर्थ काढला जात आहे. या आठवड्याभरात शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तीनदा भेट झाली. त्यानंतर शरद पवार यांनी हे विधान केल्याने त्याची चर्चा रंगली आहे.

शरद पवार हे सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी शेतकरी मेळाव्यात बोलताना त्यांनी हे सूचक विधान केलं. या मेळाव्यात मला काही प्रश्न सांगितले गेले. हे प्रश्न काही राज्य सरकारशी संबंधित आहेत. तर काही केंद्र सरकारशी संबंधित आहेत. मी सध्या कुठेच नाही. त्याची चिंता करू नका. कुठे नसलो तरी सगळीकडे आहे, असं सांगतानाच मी सर्व गोष्टींची नोंद घेतली आहे. मी प्रमुख लोकांशी चर्चा करून या जिल्ह्यातील शेतीचे महत्त्वाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेल. जिल्ह्यातील प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी केंद्र आणि राज्याशी मी बोलेल, अशी ग्वाही शरद पवार यांनी दिली.

त्याची काळजी करू नका

राजकारणात मनासारखं काम केलं नाही तर दबाव आणला जातो. चांगलं काम करणाऱ्याला बाजूला केलं जातं. कर्जमाफीत कुणाची फसवणूक झाली असेल, कुणी दबावाचं राजकारण करत असेल तर तो दबावही संपवायचा कसा याचा विचार करू. त्याची काळजी करू नका, असं पवार म्हणाले.

पवारांना हे समजतं

यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवार यांना शेतीतील काय कळतं असा सवाल मागे केला होता. सोलापुरात येऊनच शाह यांनी हे विधान केलं होतं. तो किस्सा सांगत शरद पवार यांनी अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली. देशाच्या पंतप्रधांनीनी माझ्याबद्दल उल्लेख केला. शरद पवार यांना शेतीतील काय कळतं? असं मोदी म्हणाले. त्यांचं हे विधान माझ्यासाठी नवीन नाही. अमित शाह नावाचे एक गृहस्थ आहे. ते अमित शाह या जिल्ह्यात आले होते. निवडणुकीच्या आधी. त्यांनी हेच सांगितलं होतं. शरद पवारांना काय समजतं? असं ते म्हणाले होते. त्यानंतर लोकांनी त्यांच्या उमेदवाराचा पराभव केला आणि सांगितलं. शरद पवार यांना हे समजतं आणि नीट नेटकं समजतं, असा हल्लाबोलच पवार यांनी केला.