वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आमदार एकनाथ खडसे यांच्याविषयी मोठं विधान केलं आहे. महाविकास आघाडीत रावेर लोकसभेची जागा एकनाथ खडसे यांच्यासाठी सोडण्यात आली होती. पण खडसे पक्ष सोडून जाणार होते. सुनेला जागा मिळाल्यानंतर सासरे थोडेच थांबणार होते. शरद पवार यांना माझं आवाहन आहे. तुमच्याकडे एखादी मशीन आहे का? मशीनमध्ये टाकल्यावर नेते साफ होतील अशी, अशी उपरोधिक टिप्पणी करतानाच एकनाथ खडसे यांना पक्षात घेऊ नका, असं मी शरद पवार यांना सांगितलं होतं, असा गौप्यस्फोट प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
प्रकाश आंबेडकर आज रावेरमध्ये आहेत. रावेरमध्ये प्रचार रॅलीला संबोधित करताना प्रकाश आंबेडकर यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. रावेर लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. एकनाथ खडसे यांना सर्व कळतं. खडसेंनी स्वत:च्या वापरासाठी बरोबर हुशारी केली. एकनाथ खडसे राष्ट्रवादीतून उठले आणि पुन्हा भाजपात गेले आणि हे नीतिमत्तेचे राजकारण करतात. खडसे यांनी आयाराम गयारामचं राजकारण केलं, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.
पाकिस्तानातून खोके आले तरी घेतील
यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील शिंदे सरकारवर टीका केली. पाकिस्तान आणि अमेरिकेतून खोके आले तरी हे लोक घेतील, असा हल्ला करतानाच अशा लोकांपासून सावध राहण्याचा सल्लाही आंबेडकर यांनी दिला.
तुम्हाला रस्त्यावर बसावं लागेल
शेतकरी जेव्हा दिल्लीला उपोषणाला बसले तेव्हा मोदी काय करत होते? मोदी घरामध्ये बसून बिन वाजत बसले होते. मात्र शेतकऱ्यांना ते भेटले नाहीत. पुन्हा तुम्हाला भाजपचं सरकार आणायचं का? तुम्हाला रस्त्यावर बसावं लागेल, असंही ते म्हणाले.
शेतकरी प्रचंड हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांच्या पिकाला कुठे हमीभाव मिळाला नाही. मुख्यमंत्री त्यांच्याकडे पाहत सुद्धा नाहीत. देशातील घराणेशाही आधी संपवा, मगच लोकशाही वाचेल. सध्या लोकशाही संपत चालली आहे. मोदी 2014 पासून झाले. तेव्हापासून 17 लाख नागरिक देश सोडून गेले आहेत. हे सरकार वसुली करणारं सरकार आहे, असा हल्लाही त्यांनी चढवला.
मोदींनी सर्व विकलं
पंतप्रधानाचा कार्यालय हे वसुली करण्याचा कार्यालय झालं आहे.व्यापाऱ्यांवर धाडी टाण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे पुढे तुमच्यावर धाडी पडणार आहेत. मोदी हे कर्ज काढत गेले आणि आपल्याला बुडवत गेलेत. एखाद्याने घरदार विकावं असं सुरू आहे. देशातील कंपन्या विकल्या आहेत. मोदींना पुन्हा एकदा पाच वर्ष आपण दिले तर आपल्याला सावकारापुढे झुकावं लागेल अशी परिस्थिती राहील, असंही ते म्हणाले.