लहानपणापासून मी बंडखोर, चौथीत असताना बिड्या प्यायचो आणि… विजय शिवतारेंचं वक्तव्य चर्चेत

| Updated on: Jun 23, 2024 | 12:17 PM

दहावी व बारावीत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याच्या कार्यक्रमाचे सासवडमध्ये आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी माजी मंत्री विजय शिवतारे यांनी लहानपणाचे किस्से सांगताना केलेलं वक्तव्य सध्या चांगलंच चर्चेत आलं आहे.

लहानपणापासून मी बंडखोर, चौथीत असताना बिड्या प्यायचो आणि... विजय शिवतारेंचं वक्तव्य चर्चेत
Follow us on

सासवड येथील आचार्य अत्रे सभागृहामध्ये दहावी व बारावीत प्रथम आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी माजी मंत्री विजय शिवतारे उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी संवाद साधताना शिवतारे यांनी त्यांच्या लहानपणीच्या आठवणी आणि किस्से सांगितले. मात्र त्याच दरम्यान त्यांनी केलेल्या एका वक्तव्याची सध्या खूप चर्चा सुरू आहे. मी लहानपणी खूप मस्तीखोर, बंडखोर होतो असं विजय शिवतारे म्हणाले. चौथीत असताना बिड्या प्यायचो, चक्कर येऊन पडायचो असं खळबळजनक विधानही त्यांनी केलं. बालपणीच्या आठवणींना उजाळा देताना त्यांनी अनेक किस्से सांगितले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवतारे यांनी बारामतीत अजित पवारांच्या विरोधात दंड थोपटले होते. सुनेत्रा पवारांच्या विरोधात निवडणुकीला उभं राहणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं होतं. मात्र नंतर त्यांचं बंड थंडावलं आणि त्यांनी माघार घेतली. आता ते त्यांच्या भाषणामुळे पुन्हा चर्चेत आले आहेत.

काय म्हणाले विजय शिवतारे ?

हुशार मुले हे तालुक्याचे राज्याचे देशाचे भवितव्य आहेत. प्रतिकूल परिस्थितीमध्ये आत्मविश्वास महत्त्वाचा असतो. माझं स्वप्न होतं मी मराठी धीरूभाई अंबानी बनेन. लहानपणी मी खूप वांड होतो, प्रचंड बंडखोर होतो. लहानपणी मी गुरं सांभाळण्याचं काम केलं, मी चौथीत असताना बिड्या प्यायचो, चक्कर येऊन पडायचो. यावर कोणाचा विश्वास बसेल का ? चौथीत असताना जनावरं वळायला जायचो, त्यावेळी आईच्या पिशवीतून पैसे चोरून बिड्या आणायचो आणि ओढायचो. बिडी ओढली की, चक्कर येऊन पडायचो, असा किस्सा सांगत खळबळजनक खुलासा शिवतारे यांनी केला. सासवड मधील आचार्य अत्रे सभागृहात शनिवारी गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याला ते हजर होते. तेव्हाच त्यांनी हा किस्सा सांगितले. पण हे सांगतानाच, मी पहिल्या क्रमांकावर होतो. मी कधीही अभ्यास करत बसायचो नाही तरी पहिला क्रमांक पटकावयो, असं ते म्हणाले.

बारामतीमध्ये अजित पवारांविरोधात थोपटले दंड

बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी लढत रंगली होती.बारामतीत अजित पवारांच्या गटातून सुनेत्रा पवार वि. शरद पवारांच्या गटातून सुप्रिया सुळे या निवडणुकीला उभ्या होत्या. या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी विजय मिळवला. मात्र या दोघींच्या लढतीपेक्षा अधिक चर्चा झाली ती विजय शिवतारेंच्या बंडाची. या निवडणुकीत काही काळासाठी अजित पवारांची भलतीच तारांबळ उडाली होती. अजित पवारांचे कट्टर राजकीय वैरी बनलेल्या विजय शिवतारेंनी बारामती निवडणूक लढवण्याचा चंग बांधला होता. अखेर बऱ्याच मध्यस्थीनंतर शिवतारेंचे बंड शमले आणि त्यांनी बारामतीतील निवडणुकीतून माघार घेतली. त्याबद्दलही शिवतारे बोलले. पुरंदरची ही माती साधीसुधी नसून पुरंदरच्या मातीला तर मातब्बर आणि हुशार लोकांच्या गुणधर्म आहे. पंधरा दिवस मी महाराष्ट्र हादरून ठेवला होता. मी उभा राहिलो असतो तर दोघांनाही पाडून खासदार झालो असतो, असे शिवतारे म्हणाले.