सोलापूर | 5 नोव्हेंबर 2023 : एसटी विलिनीकरण्याच्या मुद्द्यावरून एसटी कर्मचाऱ्यांची नेत्यांवर जाहीर नाराजी व्यक्त केलीय. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि वकील गुणरत्न सदावर्ते यांनी विलिनीकरणाच्या मागणीसाठी सहा महिने संप लांबवला. मात्र, सत्तेत आल्यावर ते काहीच बोलायला तयार नाही. या नेत्यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा वापर करून घेतला. त्यामुळे आता त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही. त्यावेळच्या संपामुळे आमचे पगार अडीच तीन हजारांनी वाढले. पण, तीन ते चार लाखांचे नुकसान झाले असा आरोप एसटी कर्मचाऱ्यांनी केलाय. आता एसटीचे विलिनीकरण झालेच पाहिजे अशी जोरदार मागणीही त्यांनी केली.
गुणरत्न सदावर्ते यांच्या पाठीशी उभे राहून पाहिले. मात्र, जे फलित मिळायचे होते ते काही भेटले नाही. कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्याकडे त्यांनी कधी पाहिले नाही. जो तो नेता येतो आणि कर्मचाऱ्यांचा वापर करतो. कित्येक दिवाळी, कित्येक उन्हाळे, पावसाळे आम्ही पाहिले. मात्र परिस्थिती जैसे थेच आहे, अशी टीका एसटी कर्मचाऱ्यांनी केलीय.
मागील संपाचा अनुभव पाहता 1 टक्काही कर्मचारी उद्याच्या संपात सहभागी होणार नाही. मुळात संप आहे हे आम्हाला माहितीच नाही. जरी संप झाला तरी त्यात कोणीही सहभागी होणार नाही. मागील संपात अनेकांनी आत्महत्या केल्या. मात्र, त्यांच्या कुटुंबाला बघायला कोणीही गेले नाही, असा आरोपही या कर्मचाऱ्यांनी केला.
मागे झालेल्या चार महिन्यांच्या संपामध्ये कर्मचाऱ्यांच्या हाताला काहीही लागले नाही. गुणरत्न सदावर्ते यांनी विलीनीकरणाच्या नावाखाली चार महिने लोकांची दिशाभूल केली. कोर्टातून बारा पाणी निकाल येणार. त्यानंतर विलिनीकरण होणार अशी खोटी माहिती सांगून त्यांनी कर्मचाऱ्यांना भावनिक केलं. विलिनीकरण हे कोर्टातून होणारच नाही हे सर्वांना माहीत आहे. त्यावेळी सदावर्ते हे सरकारच्या विरोधात होते. मात्र, आता ते सत्तेसोबत आहेत त्यांना संप करायची गरज काय. त्यामुळे आता कोणीही कर्मचारी या संपाच्या आगीत हात घालणार नाही, असा इशारा इंटकचे राज्य कोषाध्यक्ष श्रीकांत सड्डू, चालक राजू महामुनी, सेवा शक्ती संघर्ष संघटनेचे विभागीय सचिव बलभीम पारखे यांनी दिला.
दरम्यान, शिवसेना (ठाकरे गट) आमदार सचिन अहिर यांनी ज्यांनी एसटी संप पुकारला आहे ते सरकारचेच व्यक्ती आहेत. विरोधी पक्षात होते, तेव्हा हेच एसटी महामंडळाचे विलगीकरण झाल्याशिवाय संप मागे घेणार नाही अशी भूमिका घेत होते. आता त्यांचं सरकार आहे, त्यांना कोण अडवणार आणि कोण थांबवणार असं म्हणत टीका केलीय.
अजित पवार यांच्या मातोश्री आशा पवार यांनी अजित पवार हे माझ्या हयातीमध्ये मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली. त्यावर सचिन अहिर यांनी ‘त्यांनी व्यक्त केलेली इच्छा ही गैर नाही. परंतु, मुख्यमंत्री कोण हे नागरिक ठरवतील. त्याचबरोबर तितके आमदार निवडून यायला पाहिजेत असे देखील म्हटले. सचिन अहिर हे चिंचवडमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते.