जळगांव | 31 ऑक्टोंबर 2023 : एकीकडे राज्यात मराठा आरक्षणाच्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. मंत्री, आमदार यांच्या घरावर हल्ले होत आहेत. तर दुसरीकडे आमदार, खासदार यांचे राजीनामा सत्र सुरु झाले आहे. हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील हे दिल्लीत उपोषणाला बसले आहेत. इकडे राज्यसरकार चिंतेत आहे. हा तिढा कसा सोडवायचा याचा विचार मुख्यमंत्री शिंदे करत आहेत. विरोधकांनी याच मुद्द्यावरून राज्य सरकारला घेरलंय. मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारने विशेष अधिवेशन घ्यावे अशी त्यांची मागणी आहे. यातच जळगाव पाचोराचे शिवसेना आमदार किशोर पाटील यांनी मात्र वेगळी भूमिका घेतलीय.
महाराष्ट्रात दोन तीन आमदार आणि खासदारांनी राजीनामे दिले आहेत. अशी माहिती समोर आली आहे. माझ्या राजीनाम्याने राजीनाम्याने जर महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांचा प्रश्न सुटणार असेल तर मी अर्ध्या रात्रीही राजीनामा द्यायला तयार आहे असे आमदार पाटील म्हणाले आहेत.
मी देखील जरांगे पाटील यांच्या विशेष अधिवेशनाच्या मागणीला पाठिंबा देत आहे असे ते म्हणाले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मी तशी मागणी करणार आहे. – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल महोदय यांच्याकडे विशेष अधिवेशनाची मागणी केली असावी. पण जर ती केली नसेल तर आमदार म्हणून निश्चितपणे मराठा बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी तात्काळ अधिवेशन बोलवावे अशी मागणी करणार आहे, असे त्यांनी सांगितले.
राज्य विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनात चर्चा करून सर्वानुमते ठराव करून ह्या प्रश्नाला तातडीने मार्ग काढण्यासाठी निश्चितच प्रयत्न करेल असे आमदार पाटील म्हणाले. आमदार पदाचा राजीनामा देऊन आपण न्यायासाठी लढू शकत नाही. जर मराठा समाजाला न्याय द्यायचा असेल तर पदावर राहून आपण न्याय देऊ शकतो. जर मी आज पदाचा राजीनामा दिला तर आमदार म्हणून मला सभागृहात जाऊन प्रश्न मांडता येणार नाही. म्हणून मी आमदार राहूनच मराठा बांधवांना माझ्या पदाचा उपयोग करून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल अशी भूमिका आमदार किशोर पाटील यांनी मांडली.