औरंगाबाद : औरंगाबाद महानगरपालिका तृतीयपंथी समाजातील व्यक्तींना नोकरी देणार आहे. महानगरपालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय (IAS Officer Astik kumar Pandey) यांनी हा स्तुत्य निर्णय घेतला. राज्याच्या महापालिकांमध्ये अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग होताना दिसत आहे (IAS Officer Aurangabad Municipal Commissioner Astik kumar Pandey to give jobs to third gender)
महाराष्ट्रातील महापालिकांमध्ये प्रथमच तृतीयपंथी समाजातील व्यक्तींना नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. औरंगाबाद महानगरपालिका आणि स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेडच्या वतीने तृतीयपंथीयांना सेवेत सामावून घेतले जाणार आहे. तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आयएएस अधिकारी आस्तिक कुमार पांडे यांनी महत्त्वाची पावलं टाकली आहेत.
तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न
“तृतीयपंथी घटक नेहमीच समाजात उपेक्षित राहिला आहे. आजही समाजात त्यांना मानाचे स्थान मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना रोजगार देण्यासाठी स्मार्ट सिटी अभियानाच्या अंतर्गत कंत्राटी पद्धतीने नोकरीवर घेतले जाणार आहे” असे आस्तिक कुमार पांडे यांनी निर्णय जाहीर करताना सांगितले.
सुशिक्षित असूनही बेरोजगार
औरंगाबाद शहरात तृतीयपंथीय समाजातील व्यक्तींची संख्या पाचशेपेक्षा अधिक असल्याची माहिती आहे. यापैकी अनेक जण सुशिक्षित आहेत, परंतु समाजाच्या दृष्टीकोनामुळे त्यांच्यावर रस्त्यावर फिरुन पैसे मागण्याची वेळ येते. शैक्षणिक कुवत असूनही दारोदार पैसे मागून कुटुंब चालवण्याची आणि उदरनिर्वाह करण्याची वेळ दुर्दैवी आहे.
औरंगाबाद महापालिकेच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीत तृतीयपंथी समुदायातील सदस्यांची पात्रता, कौशल्य, त्यांच्या संभाव्य भूमिकांवर चर्चा झाली. समाजातील सदस्यांमध्ये जागृती करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या रेणुका कड आणि आस्तिक कुमार पांडेय पुढील आठवड्यात तृतीयपंथियांशी भेट घेणार आहेत.
स्वत:लाच दंड ठोठावणारा जिल्हाधिकारी
आस्तिक कुमार पांडेय यांनी यापूर्वी स्वत:लाच पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असताना, चहा पिण्यासाठी प्लास्टिक कपचा वापर केल्याने त्यांनी स्वत:वरच कारवाई केली होती. बीडमध्ये निवडणुकीबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत हा प्रसंग घडला होता.
काही पत्रकारांनी प्लास्टिकच्या कपमध्ये चहा पिण्यास नकार दिला. प्लास्टिकवर बंदी असताना अशा कपांमध्ये चहा का दिला जात आहे, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. पांडेय यांनी सर्व पत्रकारांसमोर स्वत:ला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला. एखाद्या जिल्हाधिकाऱ्याने स्वत:ला दंड ठोठावण्याचं हे कदाचित पहिलंच प्रकरण असेल.
संबंधित बातम्या :
‘लेडी सिंघम’ मोक्षदा पाटील यांच्यासोबत लग्नाच्या बेडीत कसे अडकले आस्तिककुमार?
आस्तिककुमारांच्या बदलीनंतर रिक्त पद अखेर भरलं, बीडला दीड महिन्यांनी नवे जिल्हाधिकारी
(IAS Officer Aurangabad Municipal Commissioner Astik kumar Pandey to give jobs to third gender)