2023 सालच्या बॅचमधील प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर या सध्या भलत्याच चर्चेत आल्या आहेत. त्यांचे विविध कारनामे समोर येत असून त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. त्यातच आता पूजा यांचा आणखी प्रताप समोर आला आहे. पूजा खेडकर यांनी ट्रान्सपोर्ट प्रकरणात अटक केलेल्या तिच्या नातेवाईकाला सोडवण्यासाठी नवी मुंबई पोलिसांवर दबाव आणल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी महाराष्ट्राच्या गृह विभागाला अहवाल सादर केला आहे. पूजा खेडकर यांनी मे महिन्यात नवी मुंबई पोलिसांच्या डीसीपींना फोन करून तिच्या नातेवाईकाल सोडण्यास सांगितले होते. नवी मुंबई पोलिसांनी बुधवारी हा अहवाल पाठवला आहे. त्यामुळे आता हा वाद चांगलाच वाढणार असून पूजा खेडकर यांचा पाय आणखीनच खोलात जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या संदर्भात नवा खुलासा झाला आहे. पूजा खेडकर यांनी वापरलेली ऑडी कार थर्मोवेरिटा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेडची आहे. या कंपनीच्या पूर्वीच्या डायरेक्टर पूजाच्या आई मनोरमा खेडकर यांच्यासोबत डिलिजेन्स इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये संचालक होत्या. पूजा ही डिलिजेन्स इन्फ्रा प्रोजेक्ट्सची भूतकाळातील संचालक देखील आहे. यामध्ये भष्ट्राचार झाल्याचा आरोप आयटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे.
New revelation: The Audi car used by IAS #PujaKhedkar belongs to Thermoverita Engineering Pvt Ltd. A past director of this company was also a director with Puja’s mother Manorama Khedkar in Diligence Infra Projects Pvt Ltd. Puja is also a past director of Diligence Infra… pic.twitter.com/nDjoiaWOcj
— Vijay Kumbhar (@VijayKumbhar62) July 12, 2024
बंगल्याचे बांधकाम अनधिकृत ?
तसेच पूजा खेडकर या पुण्यातील बाणेर परिसरात ज्या बंगल्यात रहात होत्या त्याच्या बाहेर अनधिकृत बांधकाम झाल्याचेही समोर आले आहे. पुण्यातील बाणेर रोडवर नॅशनल हाऊसिंग सोसायटीत खेडकर यांचा करोडो रुपये किंमत असलेला ओम दिप नावाचा बंगला आहे. या बंगल्याच्या परिसरात काही भाग हा अनधिकृत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता पुणे महानगरपालिका खेडकर यांच्या बंगल्यावर कारवाई करण्याची शक्यता आहे.
बंगल्यातून ऑडी कार हलवली
दरम्यान ज्या ऑडी कारमुळे हे प्रकरण चर्चेत आलं त्याबद्दलही नवे अपडेट्स समोर आले आहे. खेडकर यांच्या बंगल्यातून ऑडी कार हलवण्यात आली आहे. त्यांच्या बाणेर येथील बंगल्यात ऑडी कार झाकून ठेवण्यात आली होती. मात्र काल पुणे पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर आज ऑडी कार बंगल्यातून हलवण्यात आल्याची माहित समोर आली आहे. पण ती ऑडी कार नेमकी कुठे हलवली याबाबत अद्यापही प्रश्नचिन्ह आहे. याच ऑडी कारवर अंबर दिवा लावून पूजा खेडकर जिल्हाधिकारी कार्यलयात जात होत्या. शिवाय त्या बंगल्यात असणारी दुसरी पजेरो कारही खेडकर यांनी बंगल्यातून हलवली आहे.
सध्या पूजा यांची पुण्यावरुन वाशिमला बदली झाली आहे. प्रोबेशनर असताना ऑडी गाडीतून येणं, दुसऱ्यांची केबिन बळकावणं, अधिकाऱ्यांना त्रास देणं या वर्तनामुळे पूजा खेडकर चर्चेत आल्या.