माझं काम सुरुच राहिल, हसतमुखाने तुकाराम मुंढेंचा नाशिककरांना निरोप

| Updated on: Jul 05, 2019 | 5:00 PM

मनोज गाडेकर, टीव्ही 9 मराठी, नाशिक : कर्तव्यदक्ष आयएएस अधिकारी आणि नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची अखेर बदली झाली. राज्य सरकारच्या नियोजन विभागात सह सचिव म्हणून मुंढे काम पाहणार आहेत. एकीकडे मुंढे यांच्या समर्थनार्थ नाशिककरांनी प्रदर्शन केलं, तर दुसरीकडे भाजपच्या गोटात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. गेल्या 12 वर्षांच्या कारकीर्दीत मुंढेंची ही अकरावी बदली ठरली. […]

माझं काम सुरुच राहिल, हसतमुखाने तुकाराम मुंढेंचा नाशिककरांना निरोप
Follow us on

मनोज गाडेकर, टीव्ही 9 मराठी, नाशिक : कर्तव्यदक्ष आयएएस अधिकारी आणि नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची अखेर बदली झाली. राज्य सरकारच्या नियोजन विभागात सह सचिव म्हणून मुंढे काम पाहणार आहेत. एकीकडे मुंढे यांच्या समर्थनार्थ नाशिककरांनी प्रदर्शन केलं, तर दुसरीकडे भाजपच्या गोटात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. गेल्या 12 वर्षांच्या कारकीर्दीत मुंढेंची ही अकरावी बदली ठरली.

तुकाराम मुंढे यांनी आज उशिरा अकरा वाजताच्या सुमारास नाशिक महापालिकेत जाऊन आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर काही मिनिटातच मुंढेंना बदलीचे पत्र मिळाले. माझ्याकडे अद्याप बदलीसंदर्भातील कुठलीही ऑर्डर आली नाही, त्यामुळे मी नियमित कामकाजाला सुरुवात केल्याचं सांगत मुंढे यांनी आपल्या कामाला सुरुवात करत प्रसारमाध्यमांशी बोलणं टाळलं.

अखेर मुंढेंना बदलीसंदर्भातील पत्र देण्यात आलं. त्यानुसार मंत्रालयातील नियोजन विभागात सह सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नाशिककर जनतेने मुंढे यांची बदली झाल्याने नाराजी व्यक्त केली. नाशिककरांनी मुंढे यांच्या समर्थनार्थ महापालिका गेटसमोर जोरदार घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केलं. पोलिसांनी 20 ते 22 आंदोलकांना ताब्यात घेतलं.

आपलं जे दैनंदिन काम आहे, ते चालूच राहणार, असं म्हणत मुंढे यांनी आज नाशिक महापालिका आयुक्त कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला, तोही ऑफ कॅमेरा. मात्र, त्यानंतर काही वेळातच मुंढे यांना बदलीचं पत्र मिळालं. त्यामुळे मुंढेंच्या बदलीवर शिक्कामोर्तब झालं. तर, मुंढे यांच्या जागी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंढेंची बदली होताच भाजपचा जल्लोष

बदलीचे पत्र मिळताच मुंढे यांनी आपले कार्यालय सोडले असून नाशिकचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांच्याकडे पदभार सोपवला. बदली झाल्याचं अधिकृत जाहीर होताच महापौर बंगल्यासमोर भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला. आयुक्त मुंढे हे हिटलरशाही करत होते. लोकप्रतिनीधींना ते जुमानत नव्हते असं महापौर रंजना भानसी म्हणतात.

गेल्या नऊ महिन्यांपासून तुकाराम मुंढेंच्या बदलीसाठीचे प्रयत्न आणि अन्य चर्चा होत होत्या. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंढे यांच्या पाठीशी उभे राहिल्याने आमदारांसह महापौर आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी हा प्रतिष्ठेचा प्रश्न करूनही उपयोग होत नव्हता. आता फडणवीस यांनीच वरदहस्त काढून घेतल्याने मुंढे यांची बदली झाली आणि नगरसेवक-अधिकाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. आयुक्त मुंढेंनी मनपाचं काम पाहताना लोकप्रतिनिधींना तुच्छ वागणूक दिली. सर्व समित्या बासणात गुंडाळल्याचा आरोप आमदार बाळासाहेब सानप यांनी केलाय.

मुंढे यांची राज्य सरकारने अवघ्या नऊ महिन्यांत पुन्हा बदली केली. गेल्या 12 वर्षातील मुंढे यांची ही अकरावी बदली आहे. त्यांची 2016 पासूनची ही चौथी बदली आहे. आधी ते पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष, तत्पूर्वी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त होते आणि त्याही आधी सोलापूरचे जिल्हाधिकारी होते. दरम्यान, उस्मानाबादच्या जिल्हाधिकारीपदी मुंढेंची नियुक्ती झाल्याची अफवा सोशल मीडियावर व्हायरल झाली. मात्र, ती केवळ अफवाच असून मुंढेंना मंत्रालयातच नियुक्ती देण्यात आलीय.