तुकाराम मुंढे यांची बदली, राधाकृष्ण गमे नाशिकचे आयुक्त

| Updated on: Jul 05, 2019 | 5:00 PM

नाशिक : कर्तव्यदक्ष आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची नाशिक महापालिका आयुक्तपदावरुन बदली करण्यात आली आहे. उस्मानाबादचे जिल्हाधिकारी म्हणून ते आता काम पाहतील. त्यांच्या जागी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांची नाशिक महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप नगरसेवकांच्या नाराजीमुळे तुकाराम मुंढेंची बदली केल्याचं बोललं जात आहे. नाशिक हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं दत्तक […]

तुकाराम मुंढे यांची बदली, राधाकृष्ण गमे नाशिकचे आयुक्त
Follow us on

नाशिक : कर्तव्यदक्ष आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची नाशिक महापालिका आयुक्तपदावरुन बदली करण्यात आली आहे. उस्मानाबादचे जिल्हाधिकारी म्हणून ते आता काम पाहतील. त्यांच्या जागी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांची नाशिक महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप नगरसेवकांच्या नाराजीमुळे तुकाराम मुंढेंची बदली केल्याचं बोललं जात आहे.

नाशिक हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं दत्तक शहर आहे. या शहराच्या विकासाची जबाबदारी तुकाराम मुंढे यांच्याकडे होती. शहराचा विकास करायचा असेल, तर त्यासाठी महसूल महत्त्वाचा असतो आणि तो फक्त कर वसुलीतूनच येतो. पण कर आकारल्यामुळे तुकाराम मुंढे भाजप नगरसेवकांच्या निशाण्यावर आले आणि त्यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याचीही तयारी झाली होती.

मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर तुकाराम मुंढे यांच्यावरील अविश्वास ठराव निर्णय मागे घेण्यात आला होता. अखेर काही दिवस गेल्यानंतर पुन्हा एकदा तुकाराम मुंढेंची बदली करण्यात आली. पीएमपीचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक असताना तुकाराम मुंढे यांच्या निर्णयावर अनेकांची नाराजी होती. परिणामी ते सत्ताधाऱ्यांच्या निशाण्यावर आले. पुण्यातून त्यांची बदली नाशिकला करण्यात आली होती.

तुकाराम मुंढे हे 2005 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. नियमावर बोट ठेवून काम करणारा अधिकारी अशी त्यांची ओळख आहे. पण हेच अनेकांना खटकतं आणि ते सत्ताधाऱ्यांच्या कायमच निशाण्यावर येतात. एक वर्षभरही एका ठिकाणी त्यांची सेवा पूर्ण होत नाही. 18 महिने त्यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिलं, 10 महिने नवी मुंबईचे महापालिका आयुक्त होते, त्यानंतर अकरा महिने पीएमपीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलं, तर गेल्या नऊ महिन्यांपासून ते नाशिक महापालिकेचे आयुक्त होते. पण पुन्हा एकदा त्यांची बदली करण्यात आली आहे. गुन्हा फक्त एकच, की ते कायद्यावर बोट ठेवून काम करतात.