नागपूर: कोणत्याही महामार्गाची उभारणी करताना रस्त्यालगत झाडे न लावणाऱ्या कंत्राटदारांची बिलं रोखण्यात येतील, असा इशारा केंद्रीय भूपृष्ठ आणि वाहतूकमंत्री नितीन गडकरी (Nitin Gakari) यांनी दिला आहे. महामार्गाच्या प्रकल्पात रस्त्यालगत झाडे लावण्याच्या अटीचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे हा नियम कंत्राटदारांसाठी बंधनकारक आहे. या नियमाचे पालन न करणाऱ्या कंत्राटदारांची बिलं रोखा, अशा सूचना नितीन गडकरी यांच्याकडून देण्यात आल्या आहेत. या सगळ्यावर देखरेख ठेवण्यासाठी महामार्गाच्या कामाचे इ टॅगिंग आणि चित्रीकरण करून ठेवण्यात यावे, असे निर्देश कंत्राटदारांना देण्यात आले आहेत. (Union Minister Nitin Gadkari warning for national highway contracts)
नितीन गडकरी यांच्या भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गाच्या 54 प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. याअंतर्गत एकूण 829 किलोमीटर रस्त्यांचे कामकाज होणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारने 4,590 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
महामार्ग व रस्ते प्रकल्पांच्या कामाच्या दर्जात कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असे नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले. उड्डाणपुलांची जोडणी नीट पद्धतीने झाली नाही तर ती कामे कंत्राटदारांना पुन्हा करावी लागतील. कामाचा दर्जा चांगला नसेल तर तो रस्ता उखडून टाकू. संबंधित कंत्राटदाराला पुन्हा काम मिळणार नाही, अशी तंबी नितीन गडकरी यांनी दिली.
नितीन गडकरी यांनी ऑक्टोबर महिन्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) कामातील दिरंगाईबद्दल अधिकाऱ्यांना चांगलेच झापले होते. दिल्लीच्या द्वारकामध्ये प्राधिकरणाच्या कार्यालय इमारतीच्या उद्घाटनावेळी हा प्रसंग घडला होता. यावेळी त्यांनी इमारत उभारण्यात दिरंगाई झाल्याबद्दल अधिकाऱ्यांचा जाहीरपणे पाणउतारा केला. अकार्यक्षम कर्मचारी-अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याची वेळ आली आहे. अशा अधिकाऱ्यांमुळे प्रकल्प पूर्ण होण्यास विलंब होतो. याच अधिकाऱ्यांमुळे प्रकल्पांमध्ये अडचणी निर्माण होतात, असे खडे बोल त्यांनी सुनावले होते.
संबंधित बातम्या:
‘त्या’ महान अधिकाऱ्यांची छायाचित्रे इमारतीत लावा; नितीन गडकरी कामचुकार अधिकाऱ्यांवर संतापले
गडकरींकडून रोहित पवारांची मागणी मान्य; आढळगाव ते जामखेड महामार्गासाठी 399 कोटी मंजूर
गडकरीजी मानलं… 24 तासांत ‘एक्स्प्रेस वे’चा अवघड भाग बांधला; विश्वविक्रमाचे फडणवीसांकडून कौतुक
(Union Minister Nitin Gadkari warning for national highway contracts)