नांदेड: राज्य सरकारने येत्या दीड महिन्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न मार्गी लावावा. सरकारने हे करुन दाखवले तर आम्ही तुमचा सत्कार करु. मात्र, सरकारला ही गोष्ट जमली नाही तर मराठा समाज काय करेल, हे सांगता येत नाही. मराठा समाज कायदा हातात घेणार नाही, या भ्रमात सरकारने राहू नये, असा इशारा शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांनी दिला. (Vinayak Mete slams Ashok Chavan over Maratha reservation issue)
ते शनिवारी नांदेडमध्ये आयोजित केलेल्या एल्गार मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन महाविकासआघाडी सरकारला लक्ष्य केले. राज्य सरकारने नोकरभरती आणि स्पर्धा परीक्षा पुढे ढकलाव्यात. मराठा आरक्षण टिकवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी एकत्र येऊन निर्णय घेतला पाहिजे, असे विनायक मेटे यांनी सांगितले.
अशोक चव्हाण हे नाकर्ते आहेत. त्यांना मराठा आरक्षणासाठी काहीच करता येत नाही म्हणून एल्गार करावा लागतोय. आम्ही अशोक चव्हाण यांना भेटलो, पत्र लिहले, पण काहीच झाले नाही. त्यांच्या मनात खोट आहे. तुमच्यासारखा नतद्रष्ट माणूस खुर्चीवर असेपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, अशी घणाघाती टीका विनायक मेटे यांनी केली.
मराठा समाजाने ठरवले तर तुमच्या घराला घेराव घालायला वेळ लागणार नाही. कायद्याने तुमची मस्ती जिरवल्याशिवाय शिवसंग्राम पक्ष शांत बसणार नाही. आमची कोणत्याही मैदानात यायची तयारी आहे, असे मेटे यांनी म्हटले.
अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षणाच्या खटल्याबाबत 50 चुका केल्या आहेत. तुम्हाला फक्त कपिल सिब्बल आणि मनु सिंघवी साहेबांमध्ये रस आहे. आता तरी सुधरा, मराठा समाजाचे भले करा, असे मेटे यांनी म्हटले.
शंकरराव चव्हाण यांनी विष्णुपुरी प्रकल्प करुन लोकांची आयुष्य फुलवली तर तुम्ही मराठा समाजाच्या लोकांवर नांगर फिरवण्याचं काम करत आहात. गायकवाड आयोग बोगस आहे का खरा, हे एकदा महाराष्ट्राच्या जनतेला सांगा. महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणना होऊ द्या. त्यानंतर संख्याबळानुसार प्रत्येक समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणीही विनायक मेटे यांनी केली.
संबंधित बातम्या:
शरद पवारांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नात लक्ष घालावे अन्यथा उद्रेक होईल; उदयनराजे भोसलेंचा इशारा
(Vinayak Mete slams Ashok Chavan over Maratha reservation issue)