नाशिक: संभाजीराजे छत्रपती यांनी भाजपच्या खासदारकीचा राजीनामा देऊन स्वत:चा पक्ष काढला तर त्यामध्ये ते मला घेणार आहेत, या वृत्ताबद्दल मला काहीही माहिती नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले. छगन भुजबळ यांच्या या अनपेक्षित वक्तव्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया काहीशा उंचावल्या आहेत. (NCP leader Chhagan Bhujbal on sambhaji raje chhatrapati stand about news party)
ते सोमवारी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी छगन भुजबळ यांना संभाजीराजेंच्या भूमिकेविषयी विचारणा करण्यात आली. त्यावर भुजबळ यांनी म्हटले की, संभाजी महाराज वेगळा पक्ष काढणार का याबाबत मला माहिती नाही. कोणी पक्ष काढायचा किंवा नाही, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तसेच संभाजीराजेंनी वेगळा पक्ष काढलाच तर ते मला त्या पक्षात घेणार आहेत याबाबत मलातरी माहिती नाही, अशी टिप्पणी छगन भुजबळ यांनी केली. त्यामुळे छगन भुजबळ यांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय काढायचा, याबाबत सध्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.
या पत्रकारपरिषदेत छगन भुजबळ यांनी नाशिकमधील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याचे सांगितले. अत्यावश्यक दुकाने ही सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत सुरु राहतील. दुपारी तीन ते दुसऱ्या दिवशी सकाळी सहापर्यंत नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडता येणार नाही. शासकीय कार्यालयचे ही 25 टक्के क्षमतेने सुरु राहतील. तर हॉटेल्स आणि मिठाईच्या दुकानांना होम डिलिव्हरीची परवानगी देण्यात आल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी संभाजीराजे छत्रपती यांनी पुण्यात वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. शाहू महाराज आणि डॉ. आंबेडकर एकत येऊ शकतात, तर मी आणि प्रकाश आंबेडकर का एकत्र येऊ शकत नाहीत? हा भेटीमागचा हेतू होता, असे संभाजीराजे यांनी म्हटले होते.
तर प्रकाश आंबेडकर यांनी आपण संभाजीराजे यांच्यासोबत जाण्यास तयार असल्याचे वक्तव्य केले होते. आता राजकारणात शिळेपणा आला आहे. त्यांनी भूमिका घेतली तर ताजेपणा येईल. मी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी अस्पृश्य आहे. माझी इच्छा नसतानाही ते मला भाजपकडे ढकलत आहेत. पण मला त्यांच्याकडे जायचं नाही. मात्र, मी संभाजीराजेंबरोबर जायला तयार आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले होते.
संबंधित बातम्या:
चंद्रकांत पाटलांनी छत्रपतींना उपकाराची आठवण करुन दिली: संजय राऊत
राजे, मराठा आरक्षणाचा विषय वाटेल तसा वापरायला तुम्हाला ठेका दिला नाही; निलेश राणेंची टीका
(NCP leader Chhagan Bhujbal on sambhaji raje chhatrapati stand about news party)