जागा शिल्लक असेल, तर या रुग्णालयात पाठवू; तानाजी सावंत यांनी या नेत्याला डिवचलं

| Updated on: Feb 10, 2023 | 9:45 PM

काहीतरी मेंदूवर परिणाम झाला असेल. त्यांना ताबडतोब उपचार करण्याची गरज आहे. आपण त्यांना रुग्णालयात दाखल करून टाकू, अशी तानाजी सावंत यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली.

जागा शिल्लक असेल, तर या रुग्णालयात पाठवू; तानाजी सावंत यांनी या नेत्याला डिवचलं
तानाजी सावंत
Follow us on

सोलापूर : आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नेहमी आव्हान देत असतात. शिंदे यांनी वरळीत जाऊन आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली. तरीही आदित्य ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांवर टीका करणे काही कमी झाले नाही. यावर बोलताना आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांची जीभ घसरली. तानाजी सावंत म्हणाले, माझ्याकडे सध्या आरोग्य खातं (Health Department) आहे. चार मेंटल रुग्णालयं आहेत. तिथं जागा शिल्लक असेल, तर त्यांची नियुक्ती नक्की करू. आरोग्य मंत्री म्हणून हा सल्ला मी मुख्यमंत्री यांना देईन. काहीतरी मेंदूवर परिणाम झाला असेल. त्यांना ताबडतोब उपचार करण्याची गरज आहे. आपण त्यांना रुग्णालयात दाखल करून टाकू, अशी तानाजी सावंत यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली.

पंतप्रधानांकडे वैराग्याचं लक्षण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सेवाभाव वृत्ती आहे. कोरोना काळात त्यांनी जगाचा विचार केला. बाहेरच्या देशांना लसी पुरविल्या. असा नेता भारताला लाभला. आपल्या देशात रोजप्रतिकारशक्ती बऱ्यापैकी आहे. त्यामुळं फारसा परिणाम झाला नाही. पण, काही देशांतील ७० टक्के जनता कोरोनाने प्रभावित झाली होती. वैराग्याचं लक्षण हे महादेवाचं लक्षण असल्याचंही आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी सांगितलं.

जागर आरोग्याचा अभियान

जागर आरोग्याचा अभियान राबवितोय. सर्व सामान्य लोकांचे आरोग्य चांगले असेल, यासाठी प्रयत्न करतोय. गुंडेश्वर हे पुरातन मंदिर आहे. जीर्णोद्धार आम्ही केली. जे मागाल ते मिळते. तुमच्या पदरात काही ना काही पडते, असंही तानाजी सावंत यांनी सांगितलं.

काही लोकांनी सांगितलं की, २०१९ ला मला मंत्रिमंडळातून डावललं. तीन दिवसांनी धाराशीवमध्ये सेना-भाजपचं जिल्हा परिषद आलं. माझा पुतण्या धनंजय सावंत उपाध्यक्ष झाला. भाजपचा त्याठिकाणी अध्यक्ष झाला. महाराष्ट्राचं सरकार गेल्यानंतर पहिली युतीचं काम या तानाजी सावंतनं केलं, असंही ते म्हणाले.

सरकार निर्मितीचा फाउंडर तानाजी सावंत

अन्यायाच्या विरोधात लढा कसा द्यायचा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवून दिलं. शिंदे यांच्या नेतृत्वात सरकार निर्मितीचा फाउंडर तानाजी सावंत होता, असही तानाजी सावंत यांनी यावेळी सांगितलं.

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी त्यांच्या जन्मगावी माढ्याच्या मंदिरात हजेरी लावली. आपल्या भाषणातून त्यांनी मोठा खुलासा केला.