मुंबई : मार्च महिन्यात दाणादाण उडवून दिल्यानंतर भर एप्रिल (April) महिन्यातही अवकाळी पावसानं (Unseasonal Rain) महाराष्ट्रातील काही भागांत थैमान घातलंय. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार, 6 एप्रिल रोजी राज्यातील काही भागात हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या. तर आज 7 एप्रिल रोजी विदर्भ, मराठवाड्यातील प्रमुख ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. विदर्भात अनेक ठिकाणी ग्रामीण भागाला गारपीटीचा सामना करावा लागला.
पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात पुढील3 दिवसांसाठी यलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. तसेच कोल्हापूर, सातारा, सांगली, नांदेड, लातूर , बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या ठिकाणी गारा पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आली आहे.
Maharashtra state & Pune city in & around weather/alert update for next couple of days.
Ms Jyoti Sonar, Meteorologist from Weather Forecasting Division, IMD, Pune pic.twitter.com/fX1tVUQiNh— K S Hosalikar (@Hosalikar_KS) April 7, 2023
अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात भर दुपारी गारपीटीचा तडाखा बसला. ऐन दुपारी काळेकुट्ट ढग आकाशात जमा झाले आणि एकाएकी गारांच्या पावसाला सुरुवात झाली. यामुळे अनेक नागरिकांची तारांबळ उडाली. तर उन्हाळ्यात पडणाऱ्या गारांचा बच्चेकंपनीने येथेच्छ आस्वाद लुटला.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात काही गावांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा फटका बसला. भर दुपारी पाऊस आल्याने जनजीवन विस्कळीत झालंय.
बुलढाणा जिल्ह्यात काल सकाळपासून ढगाळ वातावरण होतं.. गुरुवारी दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह चिखली सह परिसरात मुसळधार पाऊस झाला. उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना अवकाळी पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला. मात्र घराबाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले होते.. मात्र आज दुपारी झालेल्या अवकाळी पावसाने वातावरण मध्ये गारवा पसरला आहे .. तर अचानक आलेल्या पावसाने जनजीवन ही विस्कळीत झाले.
वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात वादळी अवकाळी पावसाला सुरुवात झाली. अचानक पडलेल्या पावसामुळे एकच धावपळ उडाली. तसेच अनेक दुकानदार तथा व्यापार्याची एकच तारांबळ उडाली . या पावसामुळे सध्या राहिलेल्या उन्हाळी मूग,कांदाबीज, उत्पादन कांदा, आंबा मोहर, नुकसान होण्याची शक्यता आहे.
देशात सध्या वेस्टर्न डिस्टर्बन्सची परिस्थिती निर्माण झाली आहे. मध्य छत्तीसगडच्या प्रदेशातून दक्षिण तमिळनाडूकडे सातत्याने वारे वाहत आहेत. बांग्लादेशच्या ईशान्य तसेच राजस्थानच्या नैऋत्येकडील भागात चक्रिय वादळांची स्थिती आहे. त्यामुळे देशातील अनेक भागांत अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. त्यानुसार 6 ते9 एप्रिल दरम्यान राज्यात मराठवाडा तसेच विदर्भातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज विदर्भातील वाशिम, बुलढाणा, अमरावती, अकोला यासारख्या बहुतांश जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. उद्या मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांना अवकाळीच्या फटक्याला सामोरं जावं लागू शकतं. मराठवाडा आणि विदर्भासह राज्यात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे.