बारामती : 23 सप्टेंबर 2023 | भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर जहरी टीका केली होती. अजित पवार हे ‘लबाड लाड्ग्यांचे पिल्लू’ असल्याची टीका पडळकर यांनी केली. अजित पवार यांच्यावर केलेल्या या टीकेनंतर त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी पडळकर यांच्याविरोधात जोरदार आंदोलन केले होते. पुण्यात पडळकर यांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करून निषेध करण्यात आला. एकीकडे अजितदादा यांच्या समर्थनासाठी कार्यकर्ते एकवटले. मात्र, अजितदादा यांनी पडळकर यांच्या विधानावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
अजित पवार बारामतीमध्ये बारामती बँकेच्या वार्षिक सभेला उपस्थित होते. यावेळी बोलताना अजित पवार यांनी राज्यात होत असलेल्या पावसावरही भाष्य केलं. राज्यातली बहुतांश धरणं भरली आहेत. हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मात्र, अजून ओढे, नाले खळखळून वाहिले नाहीत. यंदाचे वर्ष अडचणीचं जातंय का अशी स्थिती आहे. पण येत्या काळात आणखी पावसाची अपेक्षा आहे असे ते म्हणाले.
महाराष्ट्राला सहकाराची गौरवशाली परंपरा आहे. पण, बॅंकिंग क्षेत्रामध्ये नवनवीन बदल होत आहेत. रिझर्व्ह बॅंकेने नागरी बॅंकांबद्दल धोरण बदलायला सुरुवात केलीय. मागे तर देशात मोजक्याच बॅंका ठेवायच्या अशा चर्चा होत्या. नागरी बॅंकामार्फत छोट्या कर्जदारांना कर्ज देण्यात येणार आहे. त्यामुळे छोट्या कर्जदारांना २५ लाखांपर्यंत कर्ज मिळणार आहे असे दादांनी सांगितले. कर्जपुरवठा करताना काही चुकीचं केलं तर कर्जदारासह संबंधित बॅंक अधिकाऱ्यांवरही कारवाई होवू शकते, असा इशाराही त्यांनी दिला.
अजित दादा यांच्या भाषणापूर्वी शरद पवार गटाच्या एका सदस्याने गोपीचंद पडळकर यांच्या ‘त्या विधानाचा निषेध केला. अजितदादा यांच्याबद्दल गोपीचंद पडळकर यांनी काही अपशब्द काढले. त्याच्या वक्तव्याचा शरद पवार गटाचा कार्यकर्ता या नात्याने जाहीर निषेध करतो असे ते म्हणाले. त्यावर अजित दादा चिडले. ही बँकेची सर्वसाधारण सभा आहे. यामुळे याच्यात राजकीय चर्चा आणू नयेत. अजित पवारांनी ही बारामती सहकारी बँकेची वार्षिक सभा आहे. त्यामुळे या वार्षिक सभेत कोणताही राजकीय विषय आणू नयेत अशा सक्त सूचना कार्यकर्त्यांना दिल्या. हे सांगताना अजितदादा भलतेच चिडले होते.