बीड : 7 ऑक्टोबर 2023 | मराठा आरक्षणासाठी तब्बल १७ दिवस उपोषण करणारे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील याचं लोकांना भलतंच आकर्षण. जरांगे पाटील राज्यात त्यांच्या सभांना प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय. संपूर्ण मराठवाडा जरांगे पाटील यांनी पिंजून काढलाय. ठिकठिकाणी त्याचं जोरात स्वागत होतंय. या सभेतून जरांगे पाटील सरकारवर कडाडून हल्ला करत आहेत. त्यांच्या भाषणाची लोकांना झिंग चढलीय. ते ऐकण्यासाठी रात्रभर ते जागे असतात. असाच एक किस्सा बीड येथे घडला.
बीड येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनोज जरांगे पाटील यांची सभा होती. मात्र, त्याआधीची सभा संपवून लोकांच्या गाठी भेटी घेण्यात जरांगे पाटील यांचा वेळ गेला. अध्ये मध्ये लागणाऱ्या गावात त्यांचे त्याचे स्वागत होत होते. होता होता मध्यरात्र झाली. पण, लोकांचा उत्साह काही कमी झाला नव्हता. सभेला मोठी गर्दी होती. मनोज जरांगे पाटील मध्यरात्री रात्रीचे अडीच वाजता सभेला पोहचले आणि एकच घोषणाबाजी सुरु झाली.
मी सात घंटे तुम्हाला ताटकळत ठेवले माफी मागतो असं जरांगे पाटील म्हणाले. माझं नरड आणि माझं शरीर भरून आलंय. मनातून सांगतो माझ्या जन्म भूमीने आज मला भरभरुन दिले. बीडची सभा बघण्यासाठी सरकार आताच आलंय ही माहिती मला मिळाली. हे माझं गाव आहे आणि माझा हक्काचा जिल्हा आहे, असं ते यावेळी म्हणाले.
अंतरावली सराटीत आमरण उपोषणाला बसलो असता प्राणघातक हल्ला झाला. लोकशाहीत आम्ही आंदोलन केलं आमची चूक आहे का? नऊ वर्षाच्या मुलीच्या पायात गोळी घुसली. निर्दयी सरकार मी आतापर्यंत पाहिलं नाही. ते आलं आणि म्हटलं आम्ही तुमच्यासोबत. कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही सांगितलं. ते जे गेले ते आजपर्यंत परत आलचं नाही अशी टीका त्यांनी केली.
भारतातील सर्वात उशिरा असलेली आणि मराठा एकत्रित आलेली ही सभा आहे. अण्णासाहेब पाटील आणि विनायक मेटे यांचं बलिदान विसरता येणार नाही. विदर्भातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं जातं. मात्र, मराठवाड्यातील मराठ्यांना का दिला जात नाही? मराठ्यांनो ही संधी सोडू नका. एकजूट ठेवा. आरक्षण घेतल्याशिवाय आता सुट्टी नाही. मराठे एकमेकांना बैल नांगरायला देतात. आपली एवढी एकजूट आहेत, असे त्यांनी सांगितले.
हा 17 दिवसाचा किस्सा आहे. मलाही गद्दारी करता आली असती मात्र मी केली नाही. ते मुंबईत भाकरी खाताना चर्चा करतात. आंदोलक निब्बर लागला म्हणून? काही आपले लोक आणि त्यांचे लोक खोटं बोलतात. मी कालपासून त्यांचा विरोध कमी केला आहे. ओबीसी आरक्षणाला एक टक्काही धक्का नको मात्र ते आमचं खातात. आम्हाला कुणी विरोध करायचं कारण नाही अन्यथा थेट मला येवल्याला जावे लागेल, असा इशारा त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांना दिला.
आमचे लोक नोकरीत नाहीत. सरकार जागं आहे तर एकदा डोळे फिरून इकडं बघा. ओबीसी लोकांची मुलं बाहेर देशात शिकायला आहेत. मात्र, आम्ही आहे तिथेच आहेत. आपल्या मुळावर काही लोकं उठलीत हे लक्षात ठेवा. आमच्या दादा, बापाने तुम्हाला मोठं केलं हे लक्षात ठेवा. आरक्षण मिळवून देणं माझं स्वप्न आहे. त्यामुळं 14 तारखेच्या सभेला मोठ्या संख्येने या असे आवाहनही जरांगे पाटील यांनी केलं.