वर्धा : 2 ऑक्टोबर 2023 | सेवानिवृत्त तहसीलदारांना घेण्याची जाहिरात निघाली. पण, आम्ही विरोध केला. त्यामुळे महसूलमंत्री यांनी तो निर्णय रद्द केला. एकत्रित लढाई लढली तर असे निर्णय बदलू शकतात. हे सरकार प्रयोग करून पहात आहे. याच्या प्रतिक्रिया किती येतात. सर्व सरकारी पदांवर त्यांना आपल्या विशिष्ट लोकांचा भरणा करायचा आहे. म्हणूनच विना युपीएससी सचिव नेमणे सुरु केले. हे देशात पहिल्यांदा मोदी यांनी केले. सध्या जे चाललं आहे ते संपूर्ण देश काबीज करण्यासाठी आणि स्वतःच्या मर्जीतील माणसं नियुक्त करायचं काम सुरु झालं आहे. परंतु, हा शासन निर्णय रद्द होईपर्यंत शांत बसणार नाही असा इशारा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिलाय.
वर्धा येथे कंत्राटी भरती विरोधात स्पर्धा परीक्षा भरती कृती समितीच्यावतीने सुशिक्षित युवकांनी लाक्षणिक धरणे आंदोलन सुरू केलंय. विजय वडेट्टीवार यांनी या आंदोलन स्थळाला भेट दिली. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राज्य सरकारने कंत्राटी नोकर भरतीचा शासन निर्णय काढला. त्यावेळी मीच तरुणांना आवाहन महाराष्ट्रात या जीआरची होळी करा असे आवाहन केल होते. हा शासन निर्णय घातक आहे असे ते म्हणाले.
जे तरुण दिवस रात्र एक करून त्यांचे आईवडील पोरांना स्पर्धा परीक्षेसाठी तयार करतात. सहा सहा वर्ष त्यांचे आयुष्य यात जाते. घासाघीस करतो. पण, शासन निर्णयामुळे त्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले आहे. महाराष्ट्रात हा विषय घेऊन तरुण रस्त्यावर आल्याशिवाय सरकार झुकणार नाही. कंत्राटी भरतीचा निर्णय हा तरुणाई उध्वस्त करणारा आहे. आरक्षण संपवणारा आहे. असे त्यांनी यावेळी सांगितले.
भाजप ओबीसी जनजागरण यात्रा काढणार आहे. पण, त्यांनी ओबीसीसाठी काय केलं? जातीनिहाय जनगणना केली का याचे उत्तर द्या. संसदेत जे महिला आरक्षण बिल आणलं त्यात महिलांसाठी जागा राखीव केल्या का? महाज्योतीला लोकसंख्येप्रमाणे निधी देण्याचं मान्य केले होते ते दिले का? ओबीसीसाठी सावित्रीबाई फुले स्वतंत्र घरकुल योजना आणली. त्यात पाचशे कोटीची तरतूद केली. ते आता का मिळत नाही याची उत्तरे द्या अशी टीका त्यांनी केली. भाजपाचा ही यात्रा ओबीसी हक्कासाठी जनजागरण यात्रा नव्हे तर ओबीसीचा निवडणुकीत वापर करण्यासाठी ही ओबीसीची फसवणूक यात्रा आहे असा टोला त्यांनी लगावला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही खोटे बोलत नाहीत. त्यातील ते एक म्हणजे सफाईबद्दल. एकनाथ शिंदे अजिबात खोटे बोलत नाहीत. कारण, त्यांनी नवीन मशीन शोधली. त्यात कपडे नाही तर माणसाला शुद्ध करणारी मशीन आणि पावडर शोधली आहे. आज एक व्हाट्सअँपवर ऐकलं की बसमध्ये एका पोराला विचारलं की ‘ये बस मे छे गधे चढे हैं, उसमे से तुम उतरे हो तो बचे कितने? तर तो बोलला ‘पाच’ हे या सरकारचे चाललंय अशी बोचरी टीका त्यांनी केली.