लातूर : 1 जानेवारीपूर्वी जेवढे रुग्ण उपचार घेत होते तेवढ्याच रुग्णांची आता दिवसाकाठी भर पडत आहे. गेल्या दोन दिवसांतील आकडेवारी तर (Latur) जिल्हा प्रशासनाला थक्क करणारी आहे. बुधवारी 51 तर सलग दुसऱ्या दिवशी 68 कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे लातूर जिल्हा तिसऱ्या लाटेच्या उंबठ्यावर य़ेऊन ठेपला असल्याने आता योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. गुरुवारी जिल्हाभरातील 1 हजार 993 जणांची टेस्ट करण्यात आली होती तर पैकी 68 जणांचे अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत. उपचार घेत असलेल्या 6 जणांची प्रकृती ही ठणठणीत झाल्याने त्यांची रुग्णालयातून सुटी करण्यात आली आहे.
रुग्णसंख्येत घट झाल्यामुळे जिल्हाभरातील सेंटर हे बंद करण्यात आले होते. केवळ शहरातील पूरणमल लाहोटी तंत्रनिकेतन हे एकमेव कोविड केअर सेंटर सुरु होते. मात्र, 1 जानेवारीपासून जिल्हाभरात रुग्णसंख्या ही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे अन्य चार ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरु करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी यांनी आरोग्य विभागाला दिलेल्या आहेत. तर यापूर्वी ज्या ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरु होते त्याची काय अवस्था आहे याचा आढावा आता जिल्हा प्रशासनाकडून घेतला जात आहे.
1 जानेवारी पर्यंत सर्वकाही अलबेल सुरु होते. मात्र, सध्या जी रुग्णसंख्या वाढत आहे ती चिंताजनक आहे. जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट केवळ 1 टक्यावर गेला होता. त्यामुळे जिल्हा कोरोनामुक्तीकडे वाटचाल करतोय अशी स्थिती असताना गेल्या 5 दिवसांमध्ये चित्रच बदलले आहे. सध्या पॉझिटिव्ह रेट 3.5 वर येऊन ठेपलेला आहे. त्यामुळे तिसऱ्या संभाव्य लाटेच्या अनुशंगानेच आता जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन हाच तेवढा पर्याय असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एल.एस.देशमुख यांनी सांगितले आहे.
सध्या लातूर जिल्ह्यामध्ये 187 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. डिसेंबर अखेरपर्यंत दिवसाला जिल्ह्यात 8 ते 10 रुग्णांची भर पडत होती पण आता 20 ने वाढ होत आहे. असे असतानाही बाजारपेठेत वाढती गर्दी आणि नियमांचे उल्लंघन हे लातूरकरांची चिंता वाढवणारेच विषय आहेत. जिल्हा प्रशासनाकडून केवळ आवाहन केले जात आहे पण प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठीचे प्रयत्न दिसून येत नाहीत. वाढत्या रुगणसंख्येमुळे चाकूर, 12 नं पाटी, निलंगा दापका येथे कोविड केअक सेंटर सुरु करण्याच्या हलचाली सुरु झाल्या आहेत.