मुंबई । 21 जुलै 2023 : रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीमध्ये बुधवारी रात्री साडे दहाच्या सुमारास ती घटना घडली. भर पावसात गावातली काही तरुण रात्री मोबाईलवर गेम खेळत होते. अचानक धाड धड असे आवाज ऐकू येऊ लागले. त्या तरुणांना काही तरी आक्रीत घडल्याची जाणीव झाली. ते तरुण गावकऱ्यांना गावकऱ्यांना जागे करेपर्यंत होत्याचे नव्हते झाले. विशाळ गडाखालील दरड पूर्ण गावावर कोसळली. गावातील घरच्या घरे आणि त्या घर असलेली कुटुंबाच्या कुटुंबे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. आतापर्यंत या घटनेतील मृतांची संख्या 22 इतकी झालीय. पण, या दुर्घटनेतून बचावलेल्या एका तरुणानं, बापानं सांगितलेली हृदयद्रावक कहाणी ऐकून डॉक्टर, नर्स, कर्मचारी इतकंच नव्हे तर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याही डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या.
खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे मध्यरात्री दरड कोसळली. घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफची पथके घटनास्थळी दाखल झाली. तातडीने बचाव कार्याला सुरुवात झाली. दुर्घटनेतील जखमींना कळंबोलीतील MGM हॉस्पिटल आणि चौक येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सात मंत्री घटनास्थळी इर्शाळवाडी येथे हजर होते. उपमुख्यमंत्री अजित पवार हे वॉररूममधून झालेल्या घटनेची माहिती घेत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात हजर राहून प्रत्येक घडामोडी सभागृहाला अवगत करून देत होते. तर, आरोग्यमंत्री तानाजी सावंत रुग्णालयात दाखल झालेल्या जखमींना धीर देण्यासाठी रुग्णालयात तळ ठोकून होते.
आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे रुग्णालयात जखमींची चौकशी करत होते. त्यावेळी एक अत्यंत वेदनादायी घटना त्यांच्यासमोर आली. हरी संगो यांचे घर याच वाडीत होते. कुटुंबात एकूण नऊ माणसे. रात्री अकराच्या सुमारास अचानक स्फोट झाल्यासारखा आवाज ऐकू आला. डोळ्यांची पापणी लावते न लवते तोच त्यांच्या एक दगड त्यांच्यासमोरच त्यांच्या पत्नीच्या डोक्यावर पडला. पत्नीचा जागीच मृत्यू झाला. या धक्यातून सावरत नाही तोच त्यांचा लहान मुलगाही मातीच्या ढिगाऱ्याखाली दबला गेला.
बाजूच्या रुममध्ये त्यांचा मोठा भाऊ, वहिनी आणि त्यांची लहानगी चिमुरडी मुलगी झोपली होती. मोठा भाऊ पलीकडून मदतीसाठी आवाज देत होते. आता त्याला चिंता होती आई वडील आणि बहिणीची. ते कुठे दिसत नव्हते. त्याही परिस्थितीत मृत्यूला न घाबरता हरी संगो झुंज देत होता.
हरी सांगो आणि त्याचा भाऊ मदतीसाठी वडिलांना हाक मारत होते. पण, काहीच उत्तर येत नव्हते. स्वतःची पत्नी, लहान मुलगा, वहिनी, पुतणी यांचा टाहो आता कायमचा बंद झाला होता. मन कातर करून ते दोघे आई, वडील, बहिणीचा शोध घेत होते. आणखी एक मोठा आवाज झाला. त्यांच्याही डोक्यावर काही तरी पडलं. यात भाऊ गेला आणि तो बुशुद्ध झाला. हरी संगो याला पुन्हा शुद्ध आली ती रुग्णालयातच…
आक्रोश करत होते पण वाचवायचे तरी कुणाला? बाहेर काढायचं तरी कुणाला? अशी अवस्था होती. आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्यासमोर तो घटना सांगत होता आणि ती ऐकून उपस्थितांच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहत होत्या. आरोग्यमंत्र्यांनी त्याला धीर देत जखमी रुग्णांची माहिती घेतली. त्यात हरी संगो याचे वडील, आई आणि बहीण सुखरूप असल्याचे कळले. त्यांनी लगेच हरी संगो याला त्याची माहिती दिली. पण, हरी संगो यांच्यासमोर चार जण वाचल्याचे समाधान मानावे की पाच जण गेल्याचे दुःख करायचं अशी द्विधा मनस्थिती होती.
आरोग्यमंत्री यांनी प्रशासनाला तात्काळ सूचना देत सर्वतोपरी तात्काळ मदत करण्याचे आदेश दिले. सरकार सर्वतोपरी तुम्हाला सहकार्य करेल. शासन कायम तुमच्या पाठीशी आहे असा धीर दिला. घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. जखमींवर जे आवश्यक आहेत ते सर्व उपचार केले जातील. त्यांना कुठल्याही गोष्टीची कमी पडू दिली जाणार नाही, असे आश्वासन आरोग्यमंत्र्यांनी दिले.