मुंबई : देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बोलबाला होता. भाजपची विजयी घोडदौड सुरु होती. काँग्रेसचा वारू डगमगला असताना राज्यात मात्र बाळू धानोरकर यांनी हा वारू धरून ठेवला. विदर्भात भाजपचे नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे असे मात्तबर नेते असताना चंद्रपूरमध्ये बाळू धानोरकर यांनी काँग्रेसला विजय मिळवून दिला होता. त्याच खासदार बाळू धानोरकर यांचे 30 मे रोजी निधन झाले. आज त्यांच्यावर चंद्रपूरमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
खासदार बाळू धानोरकर यांच्यावर किडनीच्या आजारावर प्रथम नागपुरात आणि नंतर दिल्लीत उपचार करण्यात आले. मात्र, त्यांचा हा लढा अयशस्वी ठरला. खासदार बाळू धानोरकर काळाचे अकाली बळी ठरेल. महाराष्ट्राच्या राजकारणात धानोरकर यांच्याप्रमाणेच तीन खासदार आणि 7 आमदार होते यांची कारकीर्द अशीच अकाली संपली.
राज्यात 2019 मध्ये लोकसभा निवडणूक झाल्या. त्यापाठोपाठ विधानसभा निवडणूक झाल्या. या निवडणुकांमधून उसंत मिळत नाही तोच देशासह राज्यात कोरोनाने थैमान घातले. याच कोरोनाने पंढरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके या पहिल्या लोकप्रतिनिधीचा बळी घेतला.
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांचे 20 नोव्हेंबर 2020 रोजी कोरोनामुळे निधन झाले. पुण्यातील रुबी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. होते. कोरोना दरम्यानच त्यांना न्यूमोनियाही झाला होता. यातच त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांचे निधन झाले.
काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे 9 एप्रिल 2021 रोजी कोरोनामुळे निधन झाले. नांदेड जिल्ह्यातील देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघातून ते आमदार होते. मुंबईत उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र विधान परिषदेतील पक्षनेते शरद रणपिसे यांचे खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान 23 सप्टेंबर 2021 रोजी निधन झाले.
कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून निवडून आलेले काँगेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे 2 डिसेंबर 2021 रोजी निधन झाले. त्यांनाही कोरोना झाला होता. कोरोनामुळे त्यांची प्रकृती ढासळू लागली. त्यांच्यावर हैदराबादमध्ये उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान वयाच्या 57 व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला.
मुंबईतील अंधेरी पूर्व मतदारसंघातून निवडून आलेले शिवसेना आमदार रमेश लटके यांचे 12 मे 2022 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 52 वर्षांचे होते. दुबई येथे मित्राला भेटायला गेले असताना रमेश लटके यांचा मृत्यू झाला.
पुण्याच्या माजी महापौर आणि कसबा मतदारसंघातील भाजप आमदार मुक्ता टिळक यांचे 22 डिसेंबर 2022 रोजी निधन झाले. त्या 57 वर्षांच्या होत्या. अनेक महिन्यांपासून कॅन्सरशी त्या झुंज देत होत्या. पण, त्यांची झुंज अपयशी ठरली. पुण्यातील गॅलेक्सी केअर रुग्णालयात त्यांचे निधन झाले.
भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे 3 जानेवारी 2023 रोजी निधन झाले. आधी राष्ट्रवादी आणि नंतर भाजपमध्ये त्यांनी आपले स्थान मजबूत केले. ते 60 वर्षांचे होते. जवळपास तीन वर्षांपासून ते ही कर्करोगाशी झुंज देत होते. चिंचवड विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले होते.
राहुल गांधी यांचे विश्वासू खासदार राजीव सातव यांचे 16 मे 2021 रोजी वयाच्या 47 वर्षी निधन झाले. सातव यांना 22 एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर उपचार करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती खालावली. अखेर महिनाभरानंतर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांचे 29 मार्च 2023 रोजी निधन झाले. ते 72 वर्षांचे होते. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचे 30 मे रोजी निधन झाले. ते 48 वर्षांचे होते. गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्यावर दिल्लीतील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. दोन दिवस ते व्हेंटिलेटरवर होते. आज त्यांच्यावर चंद्रपूरमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.