चांदवड, नाशिक : गेल्या काही महिन्यांपासून नाशिकच्या विविध भागात बसला आग लागल्याच्या घटना समोर येत आहे. काही अपघातांमध्ये तर प्रवासी होरपळून दगावल्याची बाबही समोर आली आहे. असे असतांनाही राज्य शासनाच्या परिवहन महामंडळाच्या बसला आग लागळ्याच्या घटना काही केल्या कमी होत नाहीये, नुकताच नाशिकच्या चांदवड-मालेगाव रोडवरील राहुड घाटात धावत्या बसला आग लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी दुसरीकडे बस संपूर्णतः जळून खाक झाली आहे. राहुड घाटाच्या मध्यभागीच बसला आग लागल्याने जवळपास दोन ते अडीच तास वाहतुक कोंडी झाली होती. प्रवाशांनी याबाबत अग्निशमन दल आणि पोलीस प्रशासनाला ही बाब कळवली होती. मात्र, बस संपूर्णतः जळून खाक होत आलेली असतांना अग्निशमन दल पोहचल्याने मोठे नुकसान झाले आहे.
चांदवड ते मालेगाव या महामार्गावर नेहमीच राहुड घाट परिसरात अपघात आणि आगीच्या घटना घडत असतात, महामार्ग पोलिसांना याबाबत माहिती मिळूनही त्यांना पोहचण्यासाठी विलंब होत असतो.
राहुड घाटातील रस्त्यांचे अनेकदा काम केले आहे तरीही वारंवार रस्त्याची होणारी दुरावस्था आणि अपघात यामुळे ह्या रस्त्यावरून प्रवास अनेकांसाठी डोकेदुखी ठरत असतो.
मालेगावकडून नाशिककडे येणाऱ्या बसला सकाळच्या वेळेला आग लागली होती, त्यामध्ये वाहक आणि चालक या दोघांनाही बसला आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी बस थांबवली.
बस थांबवून प्रवाशांना तात्काळ खाली उतरवून घेतले. मात्र, काही क्षणातच बसने मोठ्या प्रमाणात पेट घेतला आणि क्षणार्धात बस जळून खाक झाली.
राज्यात बसला आग लागल्याच्या घटना वारंवार समोर येत आहे, यामध्ये नाशिकमधील मिर्ची हॉटेल चौफुली, नाशिक पुणे महामार्ग, सप्तशृंगी गडावर जाणारी बसला आग लागळ्याच्या घटना ताज्या आहेत.
त्यातच चांदवड जवळील राहुड घाट म्हणजे अपघाताचे केंद्रच आहे. तिथे नेहमीच छोटा मोठा अपघात झालेला असतो, त्यामुळे तिथे खास उपाययोजना करणे गरजेचे आहे.