नाशिक : मुंबईची तुंबापुरी होतांना आपण नेहमीच पाहत असतो. मात्र, आता अशीच काहीशी परिस्थिती नाशिकची ( Nashik ) होऊ लागली आहे. नाशिकमध्ये अवघ्या तीन तासांत अतिवृष्टी (Heavyrain ) झाल्याची नोंद झाली. नाशिकमध्ये ७६.८ मिलीमीटर पावसाची नोंद झालीय. याचवेळी मात्र नाशिककरांची अक्षरशः दैना झाल्याचे पाहायला मिळाली. मुंबईप्रमाणेच (Mumbai) नाशिकमध्ये ठिकठिकाणी पाणी साचल्याने, महापालिकेच्या कामांवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागलेय.
अतिवृष्टी झाल्याने शहरातील सराफ बाजार, सारडा सर्कल, मुंबई नाका आणि जुने नाशिक परिसर अशा भागात ३ ते ४ चार तास पाण्याचा निचरा झालेला नव्हता. त्यामुळे भूमिगत गटारीच्या कामांवर नागरिकांचा संताप होऊ लागलाय.
मुंबईत ५० ते ६० मिलीमीटर पावसाची नोंद झाली तरी मुंबईची फार काळ तुंबापुरी होत नाही. मुंबईत वारंवार मुसळधार पाऊस होत असल्याने प्रशासनाने विविध प्रयोग करत त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे. याच धर्तीवर आता नाशिकच्या प्रशासनाला काम करावे लागणार आहे.
नाशिकच्या ग्रामीण भागात तर अक्षरशः ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्याने अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. जनवारांसह मानवी जीवित हानी देखील झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे गुरुवारी सायंकाळी झालेल्या पावसाने नागरिकांच्या मनात संतापाची लाट निर्माण झालीय.
नाशिकजवळील वंजारवाडी या गावातील पावसाने घर कोसळल्याने पती-पत्नीचा जागीच मृत्यू झालाय. यामध्ये मुलं मात्र थोडक्यात वाचलीय. गवारे कुटुंबावर ही आपत्ती कोसळल्याने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जातेय.
सिन्नर तालुक्यात आठ दिवसांपूर्वी ढगफुटीसदृश्य पाऊस झाला होता. शेतीसह, वाहने आणि घरांचे मोठे नुकसान झाले होते. अनेक नागरिक वाहून गेले होते, मात्र त्यांना वाचविण्यात यश आले होते. वारंवार असा मुसळधार पाऊस होऊ लागल्याने नागरिकांसोबत प्रशासनाची चिंता वाढली आहे.
अतिवृष्टी झाली तरी पाण्याच्या निचरा होणे अत्यंत महत्वाचे असते. अन्यथा पाणी साचल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होते. नाशिकच्या मध्ये ७६.८ मीमि. पाऊस पडला आणि प्रशासनाच्या कामाचे तीनतेरा झालेय. आता यावर तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.