संजय राऊत यांच्यावर चप्पल भिरकावली, ‘नारायण राणे जिंदाबाद’च्या घोषणा; सोलापुरातील धक्कादायक प्रकार

| Updated on: Dec 10, 2023 | 8:20 PM

भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांच्यावर काल चप्पल भिरकावण्यात आली होती. त्याचे आज राज्यभरात पडसाद उमटले. ही घटना ताजी असतानाच ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न झाला. तर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर सोलापुरात चप्पल भिरकावण्यात आली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. राऊत सुखरुप असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

संजय राऊत यांच्यावर चप्पल भिरकावली, नारायण राणे जिंदाबादच्या घोषणा; सोलापुरातील धक्कादायक प्रकार
solapur
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

सागर सुरवासे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, सोलापूर | 10 डिसेंबर 2023 : भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांच्यावर काल चप्पल भिरकावण्यात आली होती. इंदापूर येथे झालेल्या या प्रकाराने राज्यात खळबळ उडाली होती. या घटनेचे आज पडसादही उमटले. धनगर समाजाने रस्त्यावर उतरून या घटनेचा निषेधही नोंदवला. ही घटना ताजी असतानाच आज ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्या दिशेनेही चप्पल भिरकावण्यात आली. यावेळी चप्पल फेकणाऱ्याने नारायण राणे जिंदाबादच्या घोषणाही दिल्या. शेकडो शिवसैनिकांची उपस्थिती आणि पोलिसांचा तगडा बंदोबस्त असूनही संजय राऊत यांच्यावर चप्पल फेकण्यात आली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

संजय राऊत हे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. आज दिवसभर त्यांनी सोलापुरात विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. शिवसैनिकांशी संवाद साधला. मीडियाशीही संवाद साधला. संध्याकाळी त्यांचा मुख्य आणि महत्त्वाचा कार्यक्रम होता. राऊत यांच्या हस्ते हॉटेलचं उद्घाटन करण्यात येणार होतं. त्यामुळे राऊत थांबले होते. संध्याकाळी ते कार्यक्रम स्थळी आले. राऊत यांच्या हस्ते हॉटेलचं उद्घाटनही करण्यात आलं. त्यानंतर राऊत यांनी या ठिकाणी तडाखेबंद भाषणही दिलं.

अन् चप्पल भिरकावून पळाला

या कार्यक्रमाला शिवसैनिकांची प्रचंड गर्दी होती. पोलिसांचाही तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कार्यक्रम आटोपून संजय राऊत निघाले होते. राऊत बाहेर पडले. गाडीत बसले. त्यांची गाडी काही अंतरावर गेली. गर्दी असल्याने गाडीचा स्पीड कमी होता. इतक्यात गाडीच्या टपावर काही तरी वाजल्याचा आवाज झाला अन् सर्वच अलर्ट झाले. गाडीच्या टपावर एक पिशवी पडली होती. या पिशवीत पाच ते सहा चपलांचे जोड होते. राऊत यांच्या दिशेने या चपला भिरकावण्यात आल्या होत्या. चप्पल भिरकावल्यानंतर नारायण राणे जिंदाबादच्या घोषणा देत एक तरुण गर्दीतून पळून गेला. पोलीस त्याचा शोध घेत आहे. संजय राऊत हे सुखरुप आहेत. त्यांना काहीही झालं नसल्याचं सांगण्यात आलं.

सुषमा अंधारे यांचा ताफा…

दरम्यान, संध्याकाळीच ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचाही ताफा अडवण्याचा प्रयत्न झाला. मराठा कार्यकर्त्यांनी सुषमा अंधारे यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, अंधारे यांचा ताफा सुस्साट निघून गेला.

श्रीकांत शिंदेंसमोर घोषणा

शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे आज परभणीच्या पाथरीत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेच्या अल्पसंख्यांक विभागाकडून आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यात श्रीकांत शिंदे यांनी हजेरी लावली. काही वेळापूर्वी श्रीकांत शिंदे पाथरी येथे दाखल झाले होते. यावेली जेसीबीच्या सहाय्याने त्यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली. त्यांना एक क्विंटलचा हार घालण्यात आलाय, त्यानंतर पाथरीच्या जिल्हापरिषद मैदानात जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेला संबोधित करत असताना काही मराठा कार्यकर्त्यांनी एक मराठा लाख मराठाच्या घोषणा दिल्या. त्यामुळे शिंदे यांच्या भाषणात व्यत्यय आले. श्रीकांत शिंदे यांनी घोषणा सुरू होताच भाषण थांबवून आंदोलकांना स्टेजवर यायला सांगितलं.