मुंबई । 27 जुलै 2023 : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या वेबसाईटवर बंदी घालावी अशी मागणी करत विरोधकांनी आज सरकारला धारेवर धरले. एकीकडे सत्य बोलणारे राहुल गांधी यांच्यावर दोन वर्षाची बंदी घातली जाते. दुसरीकडे महापुरुषांबाबत लिखाण करणारे राज्यात मोकाट फिरतात. हा कसला न्याय? असा विरोधकांनी सरकारला विधानसभेत सवाल केला. यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. प्रचंड गदारोळ झाला आणि सत्ताधाऱ्यांचा निषेध करत विरोधकांनी सभात्याग केला.
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत हा प्रश्न उपस्थित केला. सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल एका वेबसाईटने आक्षेपार्ह लेख लिहून त्यांची बदनामी केली. मोठ्या राजकारण्यांबद्दल कुणी काही लिहीले तर चोवीस तासाच्या आत सायबर पोलीस अॅक्टिव्ह होतात. आकाश पाताळ एक करून त्यांना उचलून आणतात. परंतु, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल इतके आक्षेपार्ह लिहिणारा त्यांना सापडत नाही? असा सवाल आव्हाड यांनी करून हे आरोपी कधी पकडणार हे सरकारने सांगावे, अशी मागणी त्यांनी केली.
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबाबत ज्यांनी विकृत लेखन केले त्या गुन्हेगाराच्या मुसक्या आवळून त्यांची धिंड काढून रस्त्यावरून फिरवले पाहिजे. पण, सरकार त्यावर कारवाई करण्याऐवजी दिशाभूल करणारी माहिती देत आहेत अशी टीका केली.
एकीकडे ‘सत्य बोलणार्या राहुल गांधी यांना बोलण्यापासून रोखण्यासाठी दोन वर्षांची शिक्षा केली जाते. दुसरीकडे महापुरुषांबाबत लिखाण करणारे, विकृत गुन्हेगार मोकाट फिरतात. हा कसला न्याय? असा थेट सवाल त्यांनी केला.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर उत्तर देताना, गुन्हेगाराची धिंड नव्हे तर भर चौकात त्याला फाशी दिली पाहिजे अशा मताचे आम्ही आहोत असे सांगितले. मात्र, यात कायद्याने कारवाई करावी लागेल. ज्या वेबसाईटने वृत्त दिले त्याच्यावर कारवाई केली आहे.
यासंदर्भात ट्विटरला तीन पत्र लिहिले असून त्याची माहिती मागविली आहे. पोलीस सातत्याने ट्विटरच्या संपर्कात आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले किंवा इतर कोणत्याही महापुरुषांबद्दल चुकीचे लिखाण करणाऱ्याला पाठिशी घालणार नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई करणार असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
मात्र, त्यांच्या उत्तरावर विरोधकांनी हरकत घेत तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. सरकारची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप केला. यामुळे सत्ताधारी विरोधक यांच्यात खडाजंगी झाली. दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी झाल्या. अखेर सरकारच्या निषेधार्थ विरोधकांनी घोषणा देत सभात्याग केला.