चंद्रपूर : केंद्रीय मंत्री रामदास आठवले चंद्रपुरात आले होते. यावेळी ते म्हणाले, प्रा. जोगेंद्र कवाडे जवळचे मित्र आहेत. आम्ही एकत्र राहिलेलो आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोग्रेंद्र कवाडे यांना सोबत घेतले. त्यापूर्वी आमच्याशी चर्चा करणं अत्यंत आवश्यक होतं. महायुतीत येणाऱ्या लोकांचं स्वागत आहे. परंतु, जोगेंद्र कवाडे यांना सोबत घेताना आम्हाला विचारायला हवं होतं. सरळ जाहीर करणं हे अयोग्य असल्याचं रामदास आठवले यांनी सांगितलं.
शिवसेनेत कोणी जात असेल, तर आम्हाला विचारण्याची गरज नाही. पण, महायुतीत कोणी येत असेल, तर आम्हाला विचारायला हवं होतं. जोगेंद्र कवाडे यांचा सोबत घेताना आम्हाला विश्वासात घ्यायला पाहिजे होते, असंही रामदास आठवले म्हणाले.
याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मी बोलणार आहे. यापुढं असा निर्णय घेताना आम्हाला विश्वासात घ्ययला हवं होतं, असं माझं मत असल्यांचही त्यांनी म्हंटलंय. दलित समाजातून कोणाला घ्यायचं असेल तर आम्हाला विचारना करायला हवी होती.
महापुरुषांच्या बद्दल कोणीही बेताल वक्तव्य करू नये. महापुरुषांची बदनामी टाळली पाहिजे. काय बोलतो, याचं भान ठेवलं पाहिजे, असा सल्लाही रामदास आठवले यांनी दिला.
दलित संघटनेत बरेच गट आहेत. त्यापैकी रामदास आठवले यांचा गट आधीच महायुतीत आहे. प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी जवळीकता केली. त्यानंतर जोगेंद्र कवाडे यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी हातमिळवणी केली. पण, ही गोष्ट रामदास आठवले यांना पटलेली दिसत नाही. त्यामुळं त्यांनी थेट नाराजीचं व्यक्त केली.