नाशिक : शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर राज्यात सत्तांतर झाले. त्यानंतर ठाकरे सेनेतील अनेक आमदार, खासदार आणि पदाधिकारी यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यात मात्र, नाशिकमधील खासदार, आमदार यांनी प्रवेश केल्यानंतर पदाधिकारी आणि नगरसेवक यांच्यातील कोणीही प्रवेश केला नव्हता. त्यामुळे ठाकरे गटाला नाशिकमध्ये कुठलाही धक्का बसला नसल्याची चर्चा होती. असे असताना जवळपास 13 नगरसेवकांनी शिंदे गटात काही दिवसांपूर्वी प्रवेश केला. त्यामध्ये विशेष म्हणजे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, माजी स्थायी समिती सभापती आर डी धोंगडे यांच्यासह 13 नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. हे प्रवेश रोखण्यासाठी संजय राऊत यांनी नाशिकमध्ये पंधरा दिवसांतच दोनदा दौरा केला होता. डॅमेज कंट्रोल करण्यासाठी स्वतः संजय राऊत यांनी प्रयत्न केले होते, मात्र त्यात संजय राऊत यांना अपयश आले होते. संजय राऊत हे मुंबईत पोहचत नाही तोच ठाकरे गटातील नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी मुंबईची वाट धरली होती.
13 नगरसेवकांचा शिंदे गटातील प्रवेश ताजा असतांना आता आणखी नगरसेवक शिंदे गटात नवीन वर्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
ठाकरे गटाचे नाशिकचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्याकडून नाराज नगरसेवकांची मनधरणी केली जात आहे, मात्र, नगरसेवकांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करण्याचे ठरविले आहे.
नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात हे प्रवेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित होणार असल्याची माहिती समोर आली आहे, ठाकरे गटाच्या पहिल्या फळीतील नेते प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सलग चार महीने ठाकरे गटातून कोणीही पदाधिकारी किंवा नगरसेवक शिंदे गटात न केल्यानं संजय राऊत यांचा आत्मविश्वास वाढला होता, मात्र पहिलाच धक्का बसल्याने राऊत यांनी तिखट प्रतिक्रिया दिली होती.
गेलेले दलाल असून त्यांचे दारू – मटक्याचा व्यवसाय असल्याची टीका राऊत यांनी केली होती, त्यावर पलटवार म्हणून राऊत हे सिल्वर ओक चे दलाल असल्याची टीका बोरस्ते यांनी केली होती.
एकूणच हे सगळं वातावरण तापलेलं असतांना आता पहिल्या फळीतील काही पदाढीकऱ्यांचा प्रवेश शिंदे गटात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून ठाकरे गटाला दूसरा मोठा धक्का शिंदे गट देण्याच्या तयारीत आहे.