नागपुरात वाढता कोरोना, गर्दी टाळण्यासाठी विभागीय आयुक्तांनी घेतला महत्त्वाचा निर्णय

| Updated on: Mar 03, 2021 | 9:27 PM

आरोग्य संस्थांमध्ये लसीकरण केंद्राची संख्या वाढविण्यात यावी तसेच ज्येष्ठ नागरिकांचे सुलभपणे लसीकरण करता येईल या दृष्टीने नियोजन करा, असे आदेश नागपूरचे विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिले. | nagpur corona vaccination

नागपुरात वाढता कोरोना, गर्दी टाळण्यासाठी विभागीय आयुक्तांनी घेतला महत्त्वाचा निर्णय
nagpur Divisional Commissioner
Follow us on

नागपूर : कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे सर्व प्रकारच्या सार्वजनिक कार्यक्रमासोबतच गर्दी होणाऱ्या कार्यक्रमावर कठोर नियंत्रण करण्यात यावे. त्यासोबतच कोरोना प्रतिबंधक लसीकरणामध्ये 60 वर्षावरील व गंभीर आजार असलेल्या 45 वर्षावरील लाभार्थ्यांच्या लसीकरणासाठी महापालिका, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व आरोग्य संस्थांमध्ये लसीकरण केंद्राची संख्या वाढविण्यात यावी तसेच ज्येष्ठ नागरिकांचे सुलभपणे लसीकरण करता येईल या दृष्टीने नियोजन करा, असे आदेश विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिले. (Increase the number of centers for corona vaccination nagpur Divisional Commissioner)

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव व लसीकरण मोहिमेचा आढावा डॉ. संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, महापालिकेचे अप्पर आयुक्त राम जोशी तथा इतरही महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते.

कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात 60 वर्षावरील व गंभीर आजार असलेल्या 45 वर्षावरील लाभार्थ्यांच्या लसीकरणाला सुरुवात झाली असून लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिकांना त्रास होणार नाही यासाठी शहरात तसेच ग्रामीण भागात केंद्रांची संख्या वाढवतानाच प्रत्येक केंद्रावर बसण्याची सुविधा व पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्याची सूचना करताना डॉ. संजीव कुमार यांनी केली.

प्रत्येक लसीकरण केंद्रावर मार्गदर्शन व सुविधा केंद्रही सुरू

जिल्ह्यात सहा लाख नागरिकांचे लसीकरण करणे अपेक्षित आहे त्यादृष्टीने लसीकरण केंद्रांच्या संख्येत वाढ करुन दररोज 10 ते 15 हजार नागरिकांचे लसीकरण करता येईल यादृष्टीने नियोजन करावे. लसीकरणापासून कोणीही वंचित राहणार नाही यासाठी प्रत्येक केंद्रावर मार्गदर्शन व सुविधा केंद्रही सुरू करावे, अशा सूचनाही यावेळी त्यांनी दिल्यात.

11 केंद्रांवर लसीकरणाची सुविधा

नागपूर शहर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय, एम्स यासह 11 केंद्रांवर लसीकरणाची सुविधा उपलब्ध आहे. त्यासोबतच ग्रामीण भागात शासकीय ग्रामीण रुग्णालय व सर्व आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरण करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. शासकीय रुग्णालय व सुविधा केंद्रावर जनतेचा विश्वास असल्यामुळे मोठ्या प्रमाणात लसीकरणासाठी गर्दी होत असल्यामुळे या सर्व केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध कराव्यात, असे निर्देश यावेळी त्यांनी दिले.

(Increase the number of centers for corona vaccination nagpur Divisional Commissioner)

हे ही वाचा :

नांदेडच्या कर्मचाऱ्याचा ‘देशमुखी’ थाट आणि अख्खा महाराष्ट्र ‘घोड्यावर’, वाचा महाराष्ट्रातली आजची चर्चित स्टोरी सविस्तर

Video : दररोज जेवणानंतर 250 खडे खाण्याची सवय, साताऱ्याच्या आजोबांना खडे खाण्याची सवय का लागली?