ब्रिटीशांच्या जुलुमाने त्रस्त झालेल्या जनतेला महात्मा गांधी यांच्या रुपाने मोठा आधार मिळाला होता. देशाची जनतेच्या महात्मा गांधी यांच्या एका आदेशाने आंदोलनात सहभागी होत होती. साल 1930 रोजी गांधीजीने सविनय कायदेभंग चळवळ सुरु केली होती. साताऱ्यातील येडे मच्छींद्रगड या गावाचे नाना पाटील ब्रिटीश सरकाराच्या काळात तलाठी म्हणून नोकरी करीत होते. त्यांना समाजकारणाचे वेड होते. देश गांधीजींच्या नेतृत्वाने भारावलेला होता. त्यांनी मागे पुढे पाहिले नाही आणि थेट तलाठी पदाचा राजीनामा दिला आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली.
3 ऑगस्ट 1900 मध्ये नाना पाटील यांचा जन्म दक्षिण सातारा जिल्ह्यात येडे मच्छिंद्र या गावी झाला. त्यांच्या भारदस्त शरीरयष्टीमुळे ते सर्वांमध्ये उठून दिसायचे त्यांच्या सत्यशोधक समाजाचे महात्मा ज्योतिबा फुले आणि राजर्षी शाहु महाराज यांच्या विचारांचा प्रभाव होता. त्यांनी महात्मा गांधी यांच्या आदेशानुसार सविनय कायदेभंग चळवळीत भाग घेतला त्यानंतर ब्रिटीश राजवट झुगारुन देऊन त्यांनी नीरा नदीकाठापासून, वारणा नद्यांच्या खोऱ्यात प्रति सरकार म्हणजेच पत्री सरकार स्थापन केले. 9 ऑगस्ट 1942 रोजी क्रांतीसिंह नाना पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत प्रती सरकार स्थापन केले. अडीचशेहून अधिक गावात त्यांचे पत्री सरकार होते. तेथे ब्रिटीश सरकारचा कोणताही आदेश न पाळता गावांचा स्वतंत्र कारभार चालायचा.
क्रांती सिंह नाना पाटील यांचे वक्तृत्व चांगले होते. त्यांना गावकऱ्यांना ब्रिटीशांविरोधात लढण्यासाठी तयार केले. प्रति सरकारच्या माध्यमातून त्यांनी दरोडेखोर, सर्वसामान्यांना छळणारे सावकार, जुलुमी ब्रिटीश अधिकारी आणि गावगुंड यांचा बंदोबस्त करण्यासाठी स्वत:चे ‘तुफान सेना’ नावाचे सैन्य दल निर्माण केले होते. सरकारी खजिना लुटणे, पोस्ट सेवांवर हल्ला करणे, रेल्वेवर हल्ला करणे अशा प्रकारे त्यांनी ब्रिटीश सरकारला सळो की पळो करुन सोडले.
क्रांतीसिंह यांच्या पत्री सरकारमध्ये सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी न्यायालय, अन्नधान्य पुरवठा साखळी, गुंडांना शिक्षा करण्यासाठी खास व्यवस्था अशी सरकारची सर्व यंत्रणा या गावात उभी केली होती. त्यांच्या सोबत त्यावेळी नागनाथ नायकवडी ( आण्णा ), जी.डी. लाड ( बापू ) , नेताजी लाड आणि किसन अहिर ( शहीद झाले ) असे साथीदार होते. पत्री सरकारला निधी हवा होता. तेव्हा क्रांती सिंह नाना पाटील यांच्या तुफान सेनेने सातारा जिल्ह्यात 7 जून 1943 रोजी शेनोली गावात ब्रिटीशांची स्पेशल पे ट्रेन लुटली होती. 10 ऑक्टोबर 1943 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील संगावातील पोलिस ठाण्यात धावा बोलून रायफली पळविल्या होत्या. 14 एप्रिल 1944 रोजी धुळे जिल्ह्यातील चिमटाणा गावात महामार्गावर दरोडा टाकून ब्रिटीश खजाना लुटला होता.
क्रांती सिंह यांना पकडण्यासाठी ब्रिटीशांनी अनेक इनाम घोषीत केली होती. परंतू शेवटपर्यंत ते ब्रिटीशांच्या काही हाती लागले नाहीत. ते भूमिगत राहून आपले काम करीत राहीले आणि ब्रिटीशांविरोधात जनतेला एकत्र करीत राहीले. त्यांची धिप्पाड शरीरयष्टी आणि धारदार आवाजामुळे त्यांच्याकडे तरुणांचा ओढा राहीला. आणि गावेच्या गावे त्यांच्या पत्री सरकारमध्ये सामील होत राहीली. नाना पाटील यांची कन्या हौसाबाई पाटील यांनी देखील सांगली जिल्ह्यातील पोलिस स्टेशनमधील दारुगोळा लुटण्यात पुढाकार घेतला होता. कधी ते टेलिफोनच्या वायर तोडत, कधी रेल्वे लुटत, तर कधी पोस्ट ऑफीस जाळत अशा प्रकारे त्यांचा ब्रिटीश सरकारला विरोध सुरुच होता.
साल 1942 ते 1946 पर्यंत क्रांती सिंह नाना पाटील भूमिगत राहीले होते. सरकारने त्यांच्या जमीनी घरे जप्ती आणली. त्यांच्या आईच्या अंत्यसंस्काराला देखील ते उपस्थित राहीले पण ब्रिटीशांच्या काही हाती लागले नाहीत. ज्यावेळी स्वातंत्र्य मिळणार याची खात्री झाली त्याच वेळी 1946 मध्ये ते सातारा येथे प्रकट झाले. त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही भाग घेतला. शेकाप आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षात ते स्वातंत्र्यानंतर सक्रीय राहीले. ते 1957 मध्ये उत्तर सातारा लोकसभा मतदार संघातून निवडून आले. 1967 मध्ये बीड मधून भाकपचे खासदार म्हणून विजयी झाले. संसदेत मराठीतून भाषण करणारे ते पहिले खासदार ठरले. स्वांतत्र्य लढ्याच्या इतिहासात त्यांचे नाव अजरामर झाले त्यांचा 6 डिसेंबर 1976 रोजी वाळवा येथे मृत्यू झाला.