मुंबई: भारतीय हवामान खात्याकडून (आयएमडी) (India Meteorological Department) राज्यात पुढील 3 दिवस म्हणजे 8 जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा (Warning of heavy rain) देण्यात आला आहे. विशेषत म्हणजे कोंकण विभागातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार ते अति मुसळधार (64मिमी ते 200 मिमी) पावसाचा इशारा देण्यात आला आहे. खबरदारीचा इशारा उपाय म्हणून राज्यात राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (National and State Disaster Response Force) 15 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
कोकण विभागामध्ये पालघर जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 100.1 मिमी. पाऊस झाला असून, पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत असल्याने आणि भारतीय हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवीली आहे.
पालघर जिल्हा प्रशासन सतर्क असून मंत्रालय नियंत्रण कक्षाच्या संपर्कात आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात एनडीआरएफची एक टीम तैनात करण्यात आली आहे.
ठाणे जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 93.9 मिमी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात कुठेही पूर परिस्थिती नाही तसेच सर्व नद्या इशारा पातळीच्या खाली वाहत असून सकाळी 8 वाजेपर्यंत उल्हास नदीची पातळी 12.90 मीटर एवढी होती तर नदीची इशारा पातळी 16.50 मीटर तर धोका पातळी १७.५० मीटर एवढी आहे. जिल्हात सर्व प्रकारची वाहतूक सुरुळीत सुरु आहे. खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे जिल्ह्यात 2 एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत.
मुंबईत गेल्या 24 तासात मुंबई कुलाबा येथे 84 मिमी तर सांताक्रूझ येथे 193.6 मिमी पावसाची नोंद झाली आहे. अंधेरी सब वे टिळकनगर टर्मिनस, टेम्बी ब्रिज परिसर तसेच शेख मेस्त्री दर्गा कुर्ला, दादर टीटी याठिकाणी पाणी साचले आहे. मात्र अद्याप सर्व प्रकारची वाहतूक सुरळीत असल्याबाबत बीएमसी नियंत्रण कक्षाने कळविले आहे. मध्य रेल्वे वरील वाहतूक धीम्या गतीने सुरु असून पश्चिम रेल्वे मार्ग सुरळीत आहे. मुंबईमध्ये एनडीआरएफच्या 3 टीम या आधीच तैनात आहेत मात्र खबरदारीचा उपाय म्हणून 2 अतिरिक्त टीम अशा एकूण 5 टीम तैनात करण्यात आल्या आहेत.
रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 135 मिमी. पाऊस झाला आहे जिल्ह्यात कुठेही पूर परिस्थिती नाही तसेच सावित्री, कुंडलिका तसेच इतर मोठ्या नद्या धोका पातळीच्या खाली वाहत असून कशेडी घाट मार्गातील वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे. पोलादपूर, महाड व माणगाव येथील दरड प्रवण व पूर प्रवण भागातील 587 कुटुंब म्हणजे एकूण 1717 व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. आता पर्यंत जिल्ह्यात 14 घरांचे अंशतः नुकसान झाले आहे तसेच 3 घरांचे पूर्णतः नुकसान झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून रायगड जिल्ह्यात दोन एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 24 तासात 154.89 मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली असून सद्यस्थितीत पूर परिस्थिती नाही मात्र जिल्ह्यातील खेड येथील जगबुडी नदी धोका पातळीवरून वाहत आहे. संगमेश्वर तालुक्यातील शास्त्री नदी, राजापूर तालुक्यातील कोदवली नदी इशारा पातळी वरून वाहत आहेत. या भागातील नागरिकांचे आवश्यकतेनुसार स्थलांतर करण्यात येत असून नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या असून जिल्हा प्रशासन सतर्क आहे. तसेच वारंवार दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट वाहतुकीकरिता बंद करण्यात आला आहे व वाहतुक अन्य पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.
दरड प्रवण व पूर प्रवण भागातील 152 कुटुंब म्हणजे एकूण 479 व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 3 घरे जमीनदोस्त झाली असून 67 घरांचे अंशतः नुकसान झाले असून एकूण 51 गावे बाधित झाली आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या 24 तासात 155 मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली असून कुठेही पूर परिस्थिती नाही तसेच सर्व नद्या इशारा पातळीच्या खाली वाहत आहेत. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरुळीत सुरु आहे. तसेच जिल्ह्यात एका घराचे पूर्णतः तर 14 घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून रायगड जिल्ह्यात एक एनडीआरएफची टीम तैनात करण्यात आल्या आहेत.
पुणे विभागात पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यातील परिथिती सामान्य असून जिल्ह्यात कुठेही पूर परिस्थिती नाही तसेच सर्व नद्या इशारा पातळीच्या खाली वाहत असून सर्व प्रकारची वाहतुक सुरुळीत सुरु आहे.
कोल्हापूर-जिल्ह्यात सद्यस्थितीमध्ये पूर परिस्थिती नाही मात्र पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत गेल्या 24 तासात 7 फुटांनी वाढ झाली आहे. पंचगंगा नदीची सध्याची पाणी पातळी 21.6 फुट असून इशारा पातळी 39 फुट एवढी आहे. नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने झालेली वाढ आणि पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा लक्षात घेता एनडीआरएफच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच नदी काठावरील लोकांना सातत्याने सतर्कतेच्या सूचना देण्यात येत असून स्थानिक शोध व बचाव पथके तैनात करण्यात आली आहे.
अमरावती विभागात अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील चांदूरबाजार आणि मोर्शी येथे पुरजन्य परिस्थिती निर्माण झालेली होती. तरी खबरदारीचा उपाय म्हणून गावातील 2102 लोकांना जिल्यातील 7 निवारा केंद्रात हलविण्यात आहे. अद्याप कोणत्याही प्रकारच्या जीवितहानीची नोंद झाली नाही. सद्यस्थितीत जिल्ह्यात स्थानिक शोध व बचाव पथके कार्यरत आहेत.
राज्यात अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस सुरु असून मंत्रालय नियंत्रण कक्ष राज्यातील सर्व जिल्हा नियंत्रण कक्षांच्या सातत्याने संपर्कात आहे. पूर परिस्थिती बाबत उपाय योजना म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ व एसडीआरएफ यांच्या तुकड्या पूर प्रवण जिल्ह्यांमध्ये या आधीच तैनात करण्यात आल्या आहेत.
मुंबई (कांजूरमार्ग 1 घाटकोपर 1) -2, पालघर -1,रायगड- महाड- 2, ठाणे-2,रत्नागिरी-चिपळूण -2,कोल्हापूर-2,सातारा-1,सिंधुदुर्ग-1 राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) एकूण 13 टीम तैनात आहेत.तर नांदेड-1,गडचिरोली-1 अशा एकूण दोन राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) च्या तुकड्या तैनात केलेल्या आहेत. राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या कायमस्वरूपी 9 तुकड्या
मुंबई -3,पुणे-1, नागपूर-1 अशा एकूण 5 राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), तसेच धुळे-2,नागपूर-2 अशा एकूण 4 टीम राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) च्या कायमस्वरूपी तुकड्या तैनात आहेत. मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून आज दुपारी 12 वाजेपर्यंत प्राप्त माहितीनुसार हा अहवाल प्रसिध्दीसाठी देण्यात येत आहे.