नागपूरः भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली. देश अमृत महोत्सवी वर्ष साजरे करतेय, पण वाढत्या लोकसंख्येची गणितं कशी जुळवणार? त्यासाठी राज्यांचीदेखील (States in India) संख्या वाढवली पाहिजे. अमेरिका, स्वित्झर्लंडसारख्या देशांमध्ये लोकसंख्येनुसार राज्यांची रचना करण्यात आली आहे. त्यामुळेच आज तेथील राज्ये प्रगत आहेत. भारतातदेखील राज्यांची संख्या लोकसंख्येच्या गणितानुसार वाढवल्यास प्रत्येक राज्यावर जास्त लक्ष केंद्रित करून विकास करता येईल, असं वक्तव्य काँग्रेस नेते आशिष देशमुख (Congress Aashish Deshmukh) यांनी केलं आहे. स्वतंत्र विदर्भाची मागणी त्यांनी अनेक वर्षांपासून लावून धरली आहे. मात्र आता संपूर्ण देशाची विभागणीच 29 ऐवजी 75 राज्यांमध्ये करावी, या मागणीसाठी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पत्र लिहिणार आहेत. तसेच स्वतंत्र विदर्भाची मागणी अधिक तीव्र करण्यासाठी ज्येष्ठ रणनीतीकार प्रशांत किशोर यांनीदेखील विनंतीला मान देऊन यासाठी काम सुरु केले अससल्याची महत्त्वाची माहिती आशिष देशमुख यांनी दिली आहे. आमचे नागपूरचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. या चर्चेतील महत्त्वाचे मुद्दे पुढील प्रमाणे-
विदर्भाला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळावा, यासाठी आता ज्येष्ठ रणनीतीकार प्रशांत किशोर अॅक्टिव्ह झाले आहेत, अशी माहिती आशिष देशमुख यांनी दिली. ते म्हणाले, ‘ रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी कित्येक राज्यांचा अभ्यास केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी, ममता बॅनर्जी, जगनमोहन रेड्डी, तेलंगणाचे केसीआर, नितीश कुमार या सर्व लोकांच्या विजयात त्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण योगदान दिले आहे. आता ते स्वतंत्र विदर्भ राज्याच्या चळवळीत उतरण्यासाठी तयार झाले आहेत. त्यादृष्टीने मी त्यांना समजावू शकलो. आता त्यांच्या मदतीने स्वतंत्र विदर्भाची चळवळ आम्ही अधिक प्रभावीपणे राबवण्याचे ठरवले आहे. त्यांच्या टीमचे 20 मुलं-मुली सातत्याने विविध लोकांशी भेटले आहेत. त्यांचा आढावा ते प्रशांत किशोर यांना देतील. ही चळवळ नव्या दमाने समोर येईल. मला अपेक्षा आहे की या चळवळीच्या माध्यमातून केंद्र सरकार आणि भाजपला देशातलं 30 वं राज्य लवकरच स्थापन करण्यासाठी बाध्य करू..’