कुसुमाग्रजनगरी, नाशिकः त्यांचे वय वर्षे फक्त 87. तरुणाला लाजवेल असा उत्साह. तुम्हाला माहितेय ते साठी नंतर लेखक झाले. सत्तरीनंतर प्रबंध सादर केला. वयाच्या पंचाहत्तरीत संगीत शिकायला सुरुवात केली. वयाच्या ऐंशीमध्ये बंदीश रचली. आता वयाच्या तब्बल 87 वर्षांत असताना हा तरुण साहित्य संमेलनात ती बंदीश पेश करतो आणि म्हणतो, सध्याच्या काळात सर्वंकशाला महत्त्व द्या. लोकशाहीचे स्पिरीट काळजात धगधगते ठेवा. जागरूक ठेवा. होय, हे आहे ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत आणि लेखक, प्रकाशक डॉ. रामदास भटकळ यांच्याबद्ल. त्यांची नाशिकच्या साहित्य संमेलनात आज ज्येष्ठ कवी-समीक्षक चंद्रकांत पाटील आणि राजहंस प्रकाशनचे दिलीप माजगावकर यांनी घेतलेली मुलाखत विशेष गाजली. अन् आयुष्य कसे सदाबहार जगावे, हे शिकवूनही गेली.
पॉप्युलरच्या यशाचे रहस्य
रामदास भटकळांना चंद्रकांत पाटील आणि दिलीप माजगावकरांनी असे काही बोलते केले की, त्यांनी रसिकांना माहित नसलेले भटकळ, त्यांच्या आठवणीची पोतडी खुली केली. भटकळ म्हणाले 1924 मध्ये वडिलांनी पॉप्युलर काढले. आमचे सारे काम इंग्रजी पुस्तकांचे चालायचे. मी हौस म्हणून 1952 मध्ये पहिले मराठी पुस्तक काढले. लेखकाला भेटणे, चित्रकाराला भेटणे अशी कामे सुरू केली. मात्र, जे करायचे, ते उत्तम करायचे, ही खुणगाठ मनाशी बांधली. त्यामुळेच इंग्रजीत लेखन करणाऱ्या धनंजय कीर यांना मराठीत लिहिते केले. त्यानंतर 1961 मध्ये इंग्लंडला जाऊन प्रशिक्षण घेऊन आलो आणि खऱ्या अर्थाने पूर्णवेळ प्रकाश म्हणून काम सुरू केले. मात्र, त्यातही संस्थात्मक पातळीवर काम केले. आपण कामात नसल्यानंतरही प्रकाशन भक्कम चालावे, अशी व्यवस्था केली. त्यामुळे पॉप्युलरचा गाडा मी दुसरीकडे गुंतल्यानंतरही व्यवस्थित सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
अन् गांधीकडे वळलो
भटकळ म्हणाले, वडिलांनी गांधींवरचे एक पुस्तक प्रसिद्ध केलेले. मलाही गांधींजींची भुरळ होती. त्यांच्यावर काम करायचे होते. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर स्वतःला हिंदूचे पुढारी मानायचे. डॉ. आंबेडकर स्वतःला दलितांचे कैवारी समजायचे आणि जिना स्वतःला मुस्लिमांचे पुढारी मानायचे. या तिघांनीही ब्रिटीशांची मदत मागितली. मात्र, गांधी एकटे देशासाठी भांडत होते. याची जाणीवही त्यांनी यावेळी करून दिली. याच मोहनमायेने मी गांधी विचारांकडे वळलो. त्यावर काम केले. पुस्तके आली, असे ते म्हणाले.
युनिफॉर्म सिव्हील कोड
सध्या अनेकदा युनिफॉर्म सिव्हील कोड हा विषय चर्चेत असतो. याबद्दलही भटकळांनी आपली मते व्यक्त केली. मात्र, भटकळ हे स्वतः आणीबाणीच्या काळात भूमिगत होते. त्यांनी काळी काम केले, याची आठवण यावेळी चंद्रकांत पाटील यांनी करून दिली. त्याच अनुषंगाने युनिफॉर्म सिव्हील कोडकडे पाहा, असेही ते म्हणाले. यानंतर भटकळ म्हणाले की, युनिफॉर्म सिव्हील कोड होऊ नये असे नाही. मात्र, त्यासाठी अनेक गोष्टींचा विचार आपल्याला करावा लागेल. या गोष्टी कोणत्या यावर त्यांनी चर्चा केली नाही.
अन् कानेटकर नाटककार झाले
भटकळांनी आपल्या संगीताच्या आवडीबद्दल सांगितले. ते म्हणाले, संगीत माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. वसंत कानेटकर माझ्याकडे एकदा कादंबरी घेऊन आलेले. मी वाचून त्यांना आवडल्याचे सांगितले. मात्र, त्यांना हे ही सांगितले की, तुम्ही कादंबरीऐवजी नाटक लिहा. ते त्यांनी मनावर घेतले. त्यांची नाटके खूप गाजली. स्वतः त्यांनी आपल्या पुस्तकात नंतर लिहून ठेवले की, भटकळांच्या संस्कारामुळे मी खरा तर नाटककार झालो. रोहिणी हट्टंगडी यांचा पती जयदेव यांनी माझ्याकडून कस्तुरबा गांधी यांच्यावरील नाटक कसे लिहून घेतले, या आठवणींनाही त्यांनी उजाळा दिला.
मूल्याशी तडजोड नाही
भटकळ म्हणाले, प्रकाशन व्यवसायात उतरलो ते मूल्यांशी तडजोड करायची नाही, हे ठरवूनच. पुस्तके गुणवत्तेवरच विकायची हा निर्धार केला. शाळेची पुस्तके भ्रष्टाचार करून मंजूर करून घ्यावी लागतात. कधी मासिक वगैरेही सुरू केले नाही. कारण त्यासाठी जाहिराती हव्या असतात. दुसऱ्यावर अवलंबून रहावे लागते. त्यासाठी इंग्लंडला जाऊन घेतलेले शिक्षण उपयोगी ठरले. कुटुंब म्हणून नव्हे, तर संस्था म्हणून प्रकाशन व्यवसाय चालवला. पॉप्युलर सर्वांची संस्था झाली, असे भावोद्गार त्यांनी काढले.
पॉप्युलरच नाव का?
तुम्ही तुमच्या प्रकाशनाला पॉप्युलर असे इंग्रजी नाव का दिले, असा प्रश्न विचारला असता भटकळ म्हणाले की, पॉप्युलर कुठे इंग्रजीय आहे. ते मराठीच आहे ना. इतर भाषांमधले योग्य शब्द, विचार आपण घेतले नाही, तर भाषेची वृद्धी होत नाही. भाषा वाढत नाही. खरे तर पॉप्युलर हे नाव ठेवण्याचा वगैरे विचार काही केला नव्हता. वडिलांनी त्याच नावाने काम सुरू केलेले. आम्ही तेच पुढे सुरू ठेवले, हे सांगायलाही भटकळ विसरले नाहीत.
अन् बंदीश सुरू केली…
रामदास भटकळ यांनी वयाच्या 17 व्या वर्षात प्रकाशन व्यवसायात पदार्पण केले. सध्या त्यांचे वय वर्षे फक्त 87. तरुणाला लाजवेल असा उत्साह. तुम्हाला माहितेय ते साठी नंतर लेखक झाले. सत्तरीनंतर प्रबंध सादर केला. वयाच्या पंचाहत्तरीत संगीत शिकायला सुरुवात केली. वयाच्या ऐंशीमध्ये बंदीश रचली. त्यांच्याकडे अनेकजण संगीताचे धडे गिरवतायत. आज वयाच्या तब्बल 87 वर्षी साहित्य संमेलनात त्यांना माजगावकरांनी मुलाखतीचा समारोप तुमच्या बंदिशीने करा, असे आवाहन केले. तेव्हा तरुणांना लाजवेल असा उत्साह असणाऱ्या भटकळांनी सुरू धरला. कैसे ढूंढना पाऊ…
इतर बातम्याः